३४ वर्षे उलटून गेली असले तरी १८ एप्रिल १९८६ चा तो दिवस भारतीय व पाकिस्तानी क्रिकेट चाहते कधीच विसरू शकत नाहीत. आॅस्ट्रेलिशिया कपचा अखेरचा चेंडू चेतन शर्माच्या चुकीमुळे यॉर्कर ऐवजी फुलटॉस पडला आणि जावेद मियांदादने ‘ऐतिहासिक ’ षटकार ठोकत पाकिस्तानला स्वप्नवत विजय मिळवून दिला. भारताला अखेरच्या चेंडूवर चार धावांचा बचाव करता आला नाही. भारतीय क्रिकेट चाहत्यांना आजही जावेद मियांदादने डीप मिडविकेटला फटकावलेला तो षटकार आठवला की छातीत कळ येते. कारण त्यानंतर शारजाचा अर्थ भारतासाठी ‘हारजा’ झाला होता
तर मनोधैर्य उंचावलेला पाकिस्तान संघ त्यानंतर वाळवंटात शहंशाह झाला होता.
शारजामध्ये भारताने आपली पहिली स्पर्धा एप्रिल १९८४ मध्ये रॉथमन्स कप ट्रॉफीच्या रूपाने खेळली होती. त्यात भारताने जेतेपद पटकावले होते. आॅक्टोबर २००० मध्ये कोकाकोला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपाने भारताने येथे अखेरची स्पर्धा खेळली. त्यात श्रीलंकेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. दरवर्षी एप्रिल/मे आणि आॅक्टोबर/नोव्हेंबरमध्ये शारजामध्ये बॉलिवूड स्टारच्या गर्दीमध्ये आयोजित क्रिकेट स्पर्धेत जल्लोष असायचा, पण फिक्सिंग स्कॅन्डलमुळे शारजा वादात अडकले. गँगस्टर दाऊद इब्राहिम शारजा स्टेडियममध्ये प्रेक्षकांमध्ये उपस्थित असल्याचे दिसून आले. शारजा फिक्सिंगचे मोठे केंद्र असल्याचे स्पष्ट झाले. अखेर भारत सरकारने राष्ट्रीय संघाला शारजामध्ये खेळण्यास बंदी घातली. स्पर्धेत भारतीय संघाच्या अनुपस्थितीमुळे शारजामध्ये क्रिकेटची रुची कमी झाली. भारत-पाक लढत शारजा क्रिकेटचा जीव होता, पण भारत सहभागी होत नसल्यामुळे सर्वकाही व्यर्थ झाले. शारजामध्ये एप्रिल २००३ नंतर क्रिकेट स्पर्धा संपुष्टात आल्या.
जावेद मियांदादच्या त्या षटकारामुळे पराभूत झालेला भारतीय संघ विविध कर्णधारांच्या नेतृत्वाखाली शारजामध्ये एकूण १६ स्पर्धा खेळला आणि केवळ चार स्पर्धांमध्ये भारताला विजेतेपद पटकावता आले तर उर्वरित १२ मध्ये भारतीय संघाला उपविजेतेपद किंवा तिसऱ्या-चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
एप्रिल १९८८
भारताने न्यूझीलंडचा ५२ धावांनी पराभव करीत शारजा कप जिंकला
भारत ५० षटकांत ७ बाद २५० (रवी शास्त्री ७२). न्यूझीलंड ४५.३ षटकांत सर्वबाद १९८ (जॉन राईट ५५, नरेंद्र हिरवानी ४.४६).
एप्रिल १९९५
भारताने श्रीलंकेचा ८ गडी राखून पराभव करीत आशिया कप जिंकला
श्रीलंका ५० षटकांत ७ बाद २३० (असंका गुरुसिंघा ८५, व्यंकटेश प्रसाद २-३२) भारत ४१.५ षटकांत २ बाद २३३ धावा (मोहम्मद अझरुद्दीन नाबाद ९०).
एप्रिल १९९८
भारताने आॅस्ट्रेलियाचा ६ गडी राखून पराभव करीत कोका कोला कप जिंकला
आॅस्ट्रेलिया ५० षटकांत ९ बाद २७२ धावा (डॅरेन लीमन ७०, व्यंकटेश प्रसाद २-३२). भारत ४८.३ षटकांत ४ बाद २७५ (सचिन तेंडुलकर १३४).
नोव्हेंबर १९९८
भारताने झिम्बाब्वेचा १० गडी राखून पराभव करीत कोका कोला चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावली
झिम्बाब्वे ५० षटकांत ९ बाद १९६ (पॉल स्ट्रँग ४६, जवागल श्रीनाथ ३-४०). भारत ३० षटकांत बिनबाद १९७ (सचिन तेंडुलकर नाबाद १२४, सौरव गांगुली नाबाद ६३).