Join us

'सिक्सर किंग' युवराज सिंग पुनरागमनासाठी सज्ज; टी-२० खेळणार

२०११ सालच्या आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेत सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावलेल्या युवराजने गेल्या वर्षी जून महिन्यात क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

By मोरेश्वर येरम | Updated: December 15, 2020 19:44 IST

Open in App

चंदीगडविश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. टीम इंडियाचा 'सिक्सर किंग' आता स्थानिक क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. 

पुढील महिन्यात होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत पंजाबच्या संभाव्य ३० खेळाडूंच्या यादीत युवराज सिंगचा समावेश करण्यात आला आहे. २०११ सालच्या आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेत सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावलेल्या युवराजने गेल्या वर्षी जून महिन्यात क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. पण आता पंजाब क्रिकेट असोसिएशनचे सचिव पुनीत बाली यांच्या विनंतीनंतर युवराजने पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची तयारी दाखवली आहे. 

भारतासाठी ३०४ एकदिवसीय सामने, ४० कसोटी आणि ५८ टी-२० सामने खेळलेल्या ३९ वर्षीय युवराज सध्या मोहालीच्या पीसीए स्टेडियममध्ये सराव करत आहे. त्यानं इन्स्टाग्रामवर फलंदाजीचा सराव करत असतानाचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर युवराजने कॅनडाच्या ग्लोबल टी-२० स्पर्धेत सहभाग घेतला होता. बीसीसीआयच्या मार्गदर्शनाखाली होत असलेली सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा १० जानेवारीपासून सुरू होणार आहे.  

टॅग्स :युवराज सिंगटी-20 क्रिकेट