Who Is Sitanshu Kotak Team India New Batting Coach : न्यूझीलंड विरुद्ध घरच्या मैदानावर अपयश तसेच ऑस्ट्रेलियन भूमीवर लाजिरवाणी कामगिरी अशा सलग दोन कसोटी मालिका गमावल्यानंतर अखेर बीसीसीआयला उशिराने शहाणपण आले. बीसीसीआयने टीम इंडियाच्या नव्या फलंदाजी प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. सितांशु कोटक यांना टीम इंडियाचे नवे फलंदाजी प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. सितांशु कोटक हे यापूर्वी भारत अ संघाचे प्रशिक्षक होते. सितांशु यांनी सौराष्ट्रचे प्रशिक्षकपदही भूषवले आहे. सितांशु यांना इंग्लंडविरुद्धच्या वनडे आणि टी२० मालिकेसाठी टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून भूमिका देण्यात आली आहे.
कोण आहेत सितांशु कोटक?
सितांशु कोटक हा सौराष्ट्रातील दिग्गज फलंदाजांपैकी एक आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने १३० प्रथम श्रेणी सामने खेळले, ज्यामध्ये त्यांनी १५ शतकांच्या मदतीने ८०६१ धावा केल्या. सितांशु यांची फलंदाजीची सरासरी ४१ पेक्षा जास्त होती. इतकेच नाही तर लिस्ट ए मध्येही सितांशु यांनी ४२ पेक्षा जास्त सरासरीने ३०८३ धावा केल्या.
प्रशिक्षकपदाचाही अनुभव
सितांशु कोटक यांना कोचिंगचाही खूप अनुभव आहे. २०२० च्या रणजी ट्रॉफीमध्ये सितांशु हे सौराष्ट्रचे मुख्य प्रशिक्षक होते आणि त्यांचा संघ चॅम्पियन झाला. २०१९ मध्ये राहुल द्रविडची जागा घेणारी व्यक्ती म्हणजे सितांशु कोटक. २०१९ मध्ये, जेव्हा राहुल द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख बनला, तेव्हा भारत अ च्या प्रशिक्षकाची जबाबदारी सितांशु कोटक यांच्याकडे आली. आता टीम इंडियात सितांशु कोटक यांचा समावेश बॅटिंग कोचच्या रुपात करण्यात आला आहे.
सितांशु कोटक यांच्यासमोर असलेली आव्हाने
सितांशु कोटक यांच्यापुढ्यात मोठे आव्हान आहे. कारण संघातील बराचशा भारतीय फलंदाजांचा फॉर्म चांगला नाही. फलंदाजांची मानसिकता आणि तंत्र सुधारणं सितांशु यांच्यासाठी मोठी गोष्ट असेल. इंग्लंड दौऱ्यासाठी सितांशु संघाचे फलंदाजी प्रशिक्षक असल्याने त्यांच्यासमोर फलंदाजीबाबतच्या काही अडचणी घेऊन खेळाडू येतील. टीम इंडियाच्या बॅटिंग युनिटची अवस्था सध्या बिकट आहे. विराट कोहलीसारखा खेळाडू पूर्ण वेळ एका प्रकारे बाद झाला हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. या परिस्थितीत बड्या खेळाडूंना सांभाळत चांगली कामगिरी करण्याचे आव्हान सितांशु यांच्यापुढे असणार आहे.