Join us

शुभमन गिलचे अव्वल स्थान केवळ सहा गुणांनी दूर

विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर संयुक्तपणे पाचव्या स्थानी आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 08:18 IST

Open in App

दुबई : भारताचा सलामीवीर शुभमन गिल लवकरच आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचेल. आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीत गिल दुसऱ्या स्थानी कायम असून, अव्वल स्थानावरील बाबर आझमच्या तुलनेत तो केवळ सहा गुणांनी मागे आहे. 

गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये २ हजार धावा पूर्ण केल्या. त्याने सर्वात कमी डावांत हा पल्ला पार करण्याचा विश्वविक्रमही नोंदवला. गिल ८२३ गुणांसह दुसऱ्या स्थानी असून, बाबर ८२९ गुणांसह अव्वल स्थानी आहे. डेंग्यू झाल्यामुळे गिलला विश्वचषकातील पहिल्या दोन सामन्यांत खेळता आले नव्हते. यानंतर त्याने तीन सामन्यांत ९५ धावा केल्या असून, यामध्ये बांगलादेशविरुद्ध केलेल्या ५३ धावांच्या खेळीचाही समावेश आहे. विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर संयुक्तपणे पाचव्या स्थानी आहेत. तसेच, भारताचा कर्णधार रोहित शर्माने एका स्थानाने प्रगती करत आठवे स्थान पटकावले.

गोलंदाजांमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पुन्हा एकदा दुसरे स्थान पटकावले असून, ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड अव्वल स्थानी कायम आहे. कुलदीप यादवचे नववे स्थान कायम राहिले आहे. तसेच, जसप्रीत बुमराहदेखील १३व्या स्थानी कायम आहे. दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजने पाच स्थानांची झेप घेताना तिसरे स्थान पटकावले. लोकेश राहुल इंग्लंडच्या जोस बटलरसह संयुक्तपणे १९व्या स्थानी आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये शाकिब अल हसन अव्वल स्थानी कायम आहे.

 

टॅग्स :शुभमन गिल