बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात स्टार फलंदाज शुबमन गिलने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. या सामन्यात त्याने द्विशतक झळकावले आहे. इंग्लंडमध्ये असा विक्रम करणारा तो तिसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने 311 चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले. या शिवाय, गिल, भारतीय कर्णधार म्हणून इंग्लंडमध्ये द्विशतक झळकावणारा तिसरा खेळाडू बनला आहे.
शुबमन गिलने आता कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणाऱ्या सर्वात तरुण भारतीय खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले आहे. भारतीय कर्णधार म्हणून कसोटी सामन्यात द्विशतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू म्हणून मन्सूर अली खान पतौडी यांचे नाव आहे. त्यांनी 23 वर्षे 39 दिवसांचे असताना द्विशतक झळकावले होते. गिलने 25 वर्षे 298 व्या दिवशी ही कामगिरी केली.
शुबमन गिल आता भारतीय कर्णधार म्हणून कसोटीत द्विशतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. विराट कोहलीने कर्णधार म्हणून भारतासाठी 7 कसोटी द्विशतके झळकावली आहेत. त्याच्याशिवाय केवळ मन्सूर अली खान पतौडी यांना एकदाच अशी कामगिरी करता आलेली होती. मात्र आता, शुबमननेही या विशेष यादीत स्थान मिळवले आहे.
महत्वाचे म्हणजे, शुबमन गिल हा SENA देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) द्विशतक झळकावणारा पहिलाच आशियाई कर्णधार ठरला आहे. यापूर्वी, SENA देशांमध्ये आशियाई कर्णधाराचा सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानच्या नावावर होता, त्याने २०११ मध्ये १९३ धावा केल्या होत्या. परदेश दौऱ्यावर भारतीय कर्णधाराने केलेले हे दुसरे द्विशतक आहे. यापूर्वी, केवळ विराट कोहलीनेच अशी कामगिरी केली आहे.