Shubman Gill, 450 crore scam : भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल सध्या चर्चेत आहे. चौथ्या कसोटीत त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले होते. पण त्याच्या नावाची चर्चा होण्याचे कारण वेगळेच आहे. एका रिपोर्टनुसार, ४५० कोटी रुपयांच्या एका घोटाळ्याशी त्याचे नाव जोडण्यात आले आहे. शुभमन गिलसहगुजरात टायटन्सचे साई सुदर्शन, राहुल तेवतिया आणि मोहित शर्मा या खेळाडूंचेही नाव या घोटाळ्याशी जोडले जात आहे. ४५० कोटी रुपयांचा हा घोटाळा गुजरातस्थित कंपनी बीझेड ग्रुपशी संबंधित आहे. या प्रकरणी गुजरात गुन्हे अन्वेषण विभागाने म्हणजेच सीआयडीने सर्व क्रिकेटपटूंना समन्स पाठवले आहेत.
करोडोंच्या घोटाळ्यात शुभमन गिलचे नाव
बीझेड ग्रुपने गुंतवणूकदारांना बँकांपेक्षा जास्त व्याजदर देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तसे न झाल्याने गुंतवणूकदारांनी पोलिसांत तक्रार केली. अहमदाबाद मिररच्या रिपोर्टनुसार, गुजरात टायटन्सच्या खेळाडूंनीही पॉन्झी स्कीममध्ये पैसे गुंतवले आहेत. यासंदर्भात आता सीआयडी त्याची चौकशी करणार आहे. अहवालानुसार, गिलने १.९५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे तर इतर खेळाडूंनी कमी रकमेची गुंतवणूक केली आहे. गिल सध्या ऑस्ट्रेलियात असल्याने तो परतल्यावर सीआयडी त्याची चौकशी करू शकते.
घोटाळ्यात एकाला अटक
वृत्तानुसार, गुजरातच्या सीआयडीने या प्रकरणी एकाला अटक केली आहे. गेल्या महिन्यात त्यांनी बीझेड ग्रुप घोटाळ्याशी संबंधित भूपेंद्रसिंग झाला याला मेहसाणा जिल्ह्यातून अटक केली होती. भूपेंद्र सिंगने पोलिसांना सांगितले की, आजपर्यंत त्याने गुजरात टायटन्सच्या खेळाडूंनाही व्याज दिलेले नाही.
शुभमन गिलचा ऑस्ट्रेलिया दौरा
शुभमन गिलच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबद्दल बोलायचे झाले तर त्याची सुरुवात दुखापतीने झाली. याच कारणामुळे तो पर्थमध्ये पहिली कसोटी खेळू शकला नाही. त्यानंतर त्याने अडलेडमध्ये पिंक बॉल कसोटी खेळली, जिथे त्याने पहिल्या डावात ३१ धावा आणि दुसऱ्या डावात २८ धावा केल्या. ब्रिस्बेनमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीतही तो मोठी धावसंख्या करू शकला नाही, त्यानंतर त्याला मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटीतून वगळण्यात आले. मात्र, संघ व्यवस्थापनाने हा निर्णय कॉम्बिनेशन लक्षात घेऊन घेतल्याचे सांगितले. आता पुन्हा एकदा सिडनी टेस्टमध्ये तो दिसू शकतो.