श्रेयस, यशस्वी अन् शार्दुल... टीम इंडियाच्या स्टार त्रिकुटाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष

दुलीप करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत चांगली कामगिरी करून पुनरागमनासाठी तिघेही लावणार जोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 09:16 IST2025-09-04T09:15:18+5:302025-09-04T09:16:13+5:30

whatsapp join usJoin us
Shreyas Iyer Yashasvi Jaiswal Shardul Thakur All eyes on the performance of Team India star trio | श्रेयस, यशस्वी अन् शार्दुल... टीम इंडियाच्या स्टार त्रिकुटाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष

श्रेयस, यशस्वी अन् शार्दुल... टीम इंडियाच्या स्टार त्रिकुटाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बंगळुरू: श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल आणि शार्दुल ठाकूर गुरुवारपासून येथे रंगणाऱ्या दुलीप करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पश्चिम विभागाकडून मध्य विभागाविरुद्ध चांगली कामगिरी करून भारतीय संघात पुनरागमनासाठी जोर लावतील. अय्यरला आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले नाही. मात्र, तो येथे हंगामाची दमदार सुरुवात करून वेस्ट इंडिजविरुद्धच्या देशांतर्गत मालिका आणि त्यानंतरच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या दौऱ्यासाठी स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल.

अय्यरने आयपीएलमध्ये पंजाब किंग्जसाठी १७ सामन्यांत ५०.३३च्या सरासरीने आणि १७५ पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने ६०४ धावा केल्या होत्या. तरीही त्याची आशिया चषक स्पर्धेसाठी निवड झाली नाही. त्याच्या चांगल्या कामगिरीचा फायदा पश्चिम विभागालाही होईल. जैस्वालचा विचार करता, या डावखुऱ्या फलंदाजाने कसोटी संघात आपले स्थान पक्के केले आहे. पण, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो राष्ट्रीय निवड समितीची पहिली पसंती नाही. तो वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकांपूर्वी लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये आपली चांगली कामगिरी कायम ठेवू इच्छितो. 

शार्दुल पश्चिम विभागाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. तो इंग्लंडविरुद्ध चमक दाखवू शकला नव्हता. त्यामुळे निवडकर्त्यांच्या नजरेत राहण्यासाठी त्याला आपली कामगिरी सुधारावी लागेल. पश्चिम विभागाच्या इतर प्रमुख खेळाडूंमध्ये ऋतुराज गायकवाड आणि तनुष कोटियन यांचाही समावेश आहे.

मध्यची दमदार फलंदाजी

मध्य विभागाच्या दृष्टीने, ध्रुव जुरेल जर कंबरेच्या दुखापतीतून सावरला तर तो संघाचे नेतृत्व करू शकतो. तो उपांत्यपूर्व फेरीत खेळू शकला नव्हता. जुरेल नसतानाही मध्य विभाग संघाच्या फलंदाजांनी दमदार खेळ केला. हंगामी कर्णधार रजत पाटीदार, दानिश मालेवार आणि शुभम शर्मा यांनी मोठी शतके झळकावली. त्यांच्याकडे डावखुरा फिरकीपटू हर्ष दुबे आणि वेगवान गोलंदाज खलील अहमद व दीपक चाहर यांच्या रूपाने मजबूत गोलंदाजीही आहे.

स्टार खेळाडूंची अनुपस्थिती,  कोण साधणार संधी?

दुसऱ्या उपांत्य फेरीत उत्तर विभागाचा सामना दक्षिण विभागाशी होईल. दक्षिण विभागाचा कर्णधार तिलक वर्मा आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघात असल्याने या सामन्यात खेळणार नाही. त्याशिवाय वेगवान गोलंदाज वैशाक विजयकुमार आणि डावखुरा फिरकीपटू आर. साई किशोर हे दुखापतग्रस्त असल्यामुळे संघाला त्यांची कमतरता भासेल. अशा परिस्थितीत दक्षिण विभागाला एन. जगदीशन, देवदत्त पडिक्कल आणि सलमान निजार यांच्याकडून मोठ्या आशा आहे. उत्तर विभागालाही वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांची कमतरता भासेल. उत्तर विभागाच्या फलंदाजीची जबाबदारी आयुष बदोनी आणि कर्णधार अंकित कुमार यांच्यावर असेल.

Web Title: Shreyas Iyer Yashasvi Jaiswal Shardul Thakur All eyes on the performance of Team India star trio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.