भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी, ९ फेब्रुवारीला कटकच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे पहिल्या सामन्याला मुकलेला विराट कोहली या सामन्यासाठी संघात परतेल, अशी आशा भारतीय उप कर्णधार शुबमन गिल याने व्यक्त केली आहे. आता तो संघात आल्यावर प्लेइंग इलेव्हनमधून कुणाला बाहेर काढायचं? हा मोठा प्रश्न कॅप्टन, कोच आणि संघ व्यवस्थापनासमोर असेल. देशांतर्गत क्रिकेटमधून एकाच संघातून खेळणाऱ्या दोन मुंबईकरांपैकी एकाचा पत्ता कट होणार हे जवळपास निश्चित आहे. इथं एक नजर टाकुयात कोहलीसाठी कुणाला अन् का बसावे लागेल बाकावर? यासंदर्भातील माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
यशस्वीला पदार्पणाची संधी मिळाली, पण..
इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात यशस्वी जैस्वाल याला पदार्पणाची संधी मिळाली. पण त्याला संधीचं सोनं करता आले नाही. २२ चेंडूत १५ धावांची खेळी करून तो बाद झाला. यशस्वी जैस्वालनं या सामन्यात मोठी खेळी केली असती तर त्याला पुढच्या सामन्यासह चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील काही सामन्यात संधी मिळवण्यासाठी दावेदारी ठोकता आली असती. पण ही संधी आता हुकलीये. याला कारण आहे श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी.
अय्यरनं जागा केली फिक्स
श्रेयस अय्यर याची वनडेतील कामगिरी दमदार राहिली आहे. मध्यफळीतील तो उत्तम पर्याय आहे. पण इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी तो पहिली पसंती नव्हता. खुद्द अय्यरनंच मॅचनंतर ही गोष्ट स्पष्ट केली. पण मॅचला काही तास बाकी असताना संघात मिळालेल्या संधीचं त्याने सोनं करून दाखवलं. २ बाद १९ धावांवर भारतीय संघ अडचणीत असताना श्रेयस अय्यरनं धमाकेदार खेळी करून संघाला कठीण प्रसंगातून बाहेर काढलं. त्यामुळे आता त्याला बाहेर काढण्याचा विचारही कोणी करणार नाही. या कडक खेळीसह त्याने चौथ्या क्रमांकाच्या जागेवर रुमाल टाकलाय म्हणायला हरकत नाही.
यशस्वी आउट झाल्यावर कॅप्टन-उप कॅप्टन जोडी करेल डावाची सुरुवात
विराट कोहलीची संघात एन्ट्री झाल्यावर यशस्वी जैस्वाल प्लेइंग इलेव्हनमधून आउट होणार हे जवळपास निश्चित आहे. या परिस्थितीत रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही कॅप्टन उप कॅप्टनची जोडी भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करून शकते. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठीही संघाचा हाच प्लान असेल. विराट कोहली तिसऱ्या तर श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. बॅटिंग ऑर्डरमध्ये यापेक्षा वेगळा पर्याय पाहायला मिळेल असे वाटत नाही.