सर, तुम्ही म्हणाल त्या नंबरवर खेळेन...; एका वाक्याने नशीब पालटलं, श्रेयसनं करून दाखवलं

भारताचा युवा स्टार श्रेयस अय्यर याचा हा प्रवास सोपा नव्हता... आधीच संघात उशिरा पदार्पणाची संधी मिळाली, त्यात दुखापतीने नजर लावली..

By स्वदेश घाणेकर | Published: November 17, 2023 10:56 AM2023-11-17T10:56:11+5:302023-11-17T10:59:01+5:30

whatsapp join usJoin us
Shreyas Iyer Journey: Shivaji Park to team india's number 4 batsman, Injury can't stop him | सर, तुम्ही म्हणाल त्या नंबरवर खेळेन...; एका वाक्याने नशीब पालटलं, श्रेयसनं करून दाखवलं

Shreyas Iyer Journey: Shivaji Park to team india's number 4 batsman, Injury can't stop him

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

२०११ ची वर्ल्ड कप फायनल पाहण्यासाठी तो मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बसला होता... सोबत असलेल्या मित्रांना त्याने तेव्हाच सांगितलं होतं की, मी एक दिवस भारतासाठी वर्ल्ड कप खेळेन अन् परवा त्याने याच वानखेडेवर शतक झळकावून १२ वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवलं... 

भारताचा युवा स्टार श्रेयस अय्यर याचा हा प्रवास सोपा नव्हता... त्यात खांद्याच्या दुखापतीने त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मुकावे लागलेले. आधीच संघात उशिरा पदार्पणाची संधी मिळाली, त्यात दुखापतीने नजर लावली.. संघर्ष हा त्याच्या सोबतच प्रवास करताना दिसला, परंतु तरीही तो खचला नाही.. मुंबईच्या क्रिकेटपटूंच्या रगारगात असलेला 'खडूस'पणा त्याला ऊर्जा देत राहिला... 

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडिया ज्या चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाच्या शोधात होती, तो शोध श्रेयस अय्यरने संपवला. २०१९च्या वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकावर भारताने चार फलंदाज खेळवले आणि त्यांना मिळून २८.७च्या सरासरीने २५९ धावा करता आल्या होत्या. पण, श्रेयसने या वर्ल्ड कपमध्ये एकट्याने ५२६ धावा कुटल्या आहेत आणि त्याही ७५.१४च्या सरासरीने. वानखेडेवर त्याने वर्ल्ड कपमधील भारताकडून तिसरे जलद शतक झळकावले... पण, विराटच्या पन्नासाव्या ऐतिहासिक शतकामुळे अय्यरला विजयाचं हवं तेवढं श्रेय मिळाले नाही...

शिवाजी पार्क ते टीम इंडिया...

मुंबईकर श्रेयसचा इथवरचा प्रवास सोपा नक्की नव्हता... घरची परिस्थिती चांगली असली तरी संघर्ष कुणाला चुकलेला नाही... २०१८मध्येच त्याचे कसोटी संघात पदार्पण झाले असते, परंतु काही परिस्थितींमुळे त्यासाठी डिसेंबर २०२१ उजाडावे लागले. २०१९मध्येही चौथ्या क्रमांकासाठी त्याची चर्चा होतीच, परंतु तेथेही माशी शिंकली.. त्यात मागील दोन वर्षं तो दुखापतीमुळे मैदानाबाहेर आहे. आंतरराष्ट्रीय सामने सोडाच, तो आयपीएलमध्येही खेळला नव्हता.. अशा परिस्थितीत वर्ल्ड कपसाठी त्याची निवड ही जोखीमच होती. 

पहिल्या दोन सामन्यांत अपयशी ठरलेल्या श्रेयसवर टीकाही झाली. पण, राहुल द्रविड, रोहित शर्मा यांनी त्याच्यावर विश्वास दाखवला... कोण काय बोलतंय याकडे तू दुर्लक्ष कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, हे त्यांनी श्रेयसला सांगितले आणि त्याचा ग्राफ बघा कसा उंचावला! २००३मध्ये त्याचे वडील संतोष यांनी त्याला शिवाजी पार्क जिमखान्यात नेले. प्रविण आम्रे, पद्माकर शिवलकर आणि संदेश कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली तो शिकला... ११ वर्षीय श्रेयसमधील स्पार्क या तिघांनी ओळखला.


 
तेव्हाही श्रेयस उशिरा आलेला आणि तोपर्यंत २५ खेळाडूंची निवड निवड झाली होती. त्याच्या नशिबी प्रतीक्षा तेव्हाही लिहिली होतीच. पण, तो प्रयत्न करत राहिला आणि त्याच्यातील प्रगती पाहून आम्रे इम्प्रेस झाले. २०१३-१४मध्ये त्याच्याकडे मुंबईच्या १९ वर्षांखालील संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आणि विनोद राघवन यांना ते श्रेय जाते. त्यात २०१४मध्ये आम्रे मुंबई संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावर आले आणि श्रेयसच्या फेव्हरमध्ये हे घडले. पण, स्थानिक क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या श्रेयसला रणजी करंडक स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यांत ७व्या क्रमांकावर खेळावे लागले.  

२०१४-१५च्या पर्वात बंगालविरुद्धच्या महत्त्वाच्या लढतीत आम्रे तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाजाच्या शोधात होते. तेव्हा आम्रेंनी श्रेयसला विचारले. तेव्हा, 'सर तुम्ही सांगाल त्या क्रमांकावर मी खेळेन' असे त्वरित म्हटले. हे आव्हान स्वीकारल्यावर त्याने १७५ चेंडूत १५३ धावांची खेळी केली. तिथून खऱ्या अर्थाने श्रेयसचा स्पार्क दिसला..

आम्रे यांच्या सल्ल्यानंतरच श्रेयस अभिषेक नायर यांच्याकडे गेला आणि श्रेयसला दिशा मिळाली. फिटनेसवर श्रेयसने काम करण्यास सुरुवात केले. मेडिटेशन व दैनंदिन व्यायाम सुरू झाला आणि तीन वर्षांची मेहनत कामी आली. २०१५मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने २.६ कोटींत त्याला ताफ्यात घेतले. ३ ट्वेंटी-२० सामन्यांचा अनुभव गाठीशी असलेल्या युवा खेळाडूसाठी ही खूप मोठी रक्कम व संधी होती. त्यानेही संधीचं सोनं करताना ४३९ धावा चोपल्या आणि आयपीएलच्या त्या पर्वातील तो most promising youngster  ठरला.  

मार्च २०१७मध्ये विराट कोहलीला बॅक अप म्हणून श्रेयसला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत निवडले गेले होते. त्याचवर्षी ट्वेंटी-२० व वन डे संघात त्याचे पदार्पण झाले, पण यश काही सहज त्याच्या वाट्याला आले नाही. २०२० मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याच्याकडे कर्णधारपद सोपवले. २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी पदार्पणात त्याने शतक झळकावले. पदार्पणात शतक झळकावणारा तो सोळावा भारतीय कसोटी फलंदाज ठरला. 

Image

पाठदुखी अन् संघाबाहेर..

सर्व सुरळीत होईल, असे वाटत असताना पाठदुखीने त्याला ग्रासले. त्याला संघाबाहेर जावे लागले आणि तिथून तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसनासाठी दाखल झाला. प्रचंड मेहनत घेऊन त्याने टीम इंडियात कमबॅक केले अन् आज त्याने टीकाकारांना गप्प केलेय... वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासातील भारताचा तो चौथ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे.

 

वन डे क्रिकेटमध्ये श्रेयसची कामगिरी 

  • २०२२ मध्ये १५ इनिंग्जमध्ये ५५.७च्या सरासरीने ७२४ धावा
  • २०२३ मध्ये १७ इनिंग्जमध्ये ५६.४च्या सरासरीने ७९० धावा
  • वर्ल्ड कपमध्ये १० इनिंग्जमध्ये ७५.१४च्या सरासरीने ५२६ धावा
  • चौथ्या क्रमांकावर - ३२ इनिंग्जमध्ये ५३च्या सरासरीने १३९३ धावा
  • कारकीर्द - ५२ इनिंग्जमध्ये ५०.६च्या सरासरीने २३२७ धावा 

Web Title: Shreyas Iyer Journey: Shivaji Park to team india's number 4 batsman, Injury can't stop him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.