Join us

धक्कादायक! फिक्सिंगमध्ये दोषी ठरल्यावर दोन क्रिकेटपटूंवर आजीवन बंदी

या दोन खेळाडूंनी एका सामन्यात फिक्सिंग केल्याचा संशय आयसीसीला आला होता. आयसीसीने याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश भ्रष्टाचारविरोधी पथकाला दिले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 20:25 IST

Open in App

नवी दिल्ली :  मॅच फिक्सिंगप्रकरणी दोषी ठरलेल्या दोन क्रिकेटपटूंवर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घेतला आहे.

या दोन खेळाडूंनी एका सामन्यात फिक्सिंग केल्याचा संशय आयसीसीला आला होता. आयसीसीने याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश भ्रष्टाचारविरोधी पथकाला दिले होते. या पथकाने या प्रकरणाची सखोल चौकशी केली. या चौकशीनंतर हे खेळाडू दोषी आढळले. या पथकाने आपला अहवाल आयसीसीला सादर केला. या अहवालानुसार आयसीसीने या दोन्ही खेळाडूंवर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

नदीम अहमद आणि इरफान अहमद हे पाकिस्तानमध्ये जन्मलेले भाऊ आहेत. नदीमचा जन्म 28 सप्टेंबर 1987 साली झाला होता, तर इरफानचा जन्म 20 नोव्हेंबर 1989 साली झाला होता. या दोघांचाही जन्म पाकिस्तान येथील बहावलपुर येथे झाला होता. इरफान हा 2008-09 साली हाँगकाँगचा सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. सध्या हे दोघे हाँगकाँगकडून खेळतात. या दोघांवर आयसीसीने आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर या संघातील हसीब अमजदवर पाच वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

नदीम हा फिरकीपटू आहे. त्याने 25 एकदिवसीय आणि 24 ट्वेन्टी-20 सामने खेळले आहे. एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये नदीमने अनुक्रमे 38 आणि 25 विकेट्स घेतल्या आहेत. नदीमने 2004 साली पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

इरफान हा अष्टपैलू खेळाडू आहे. आतापर्यंत इरफानने सहा एकदिवसीय आणि आठ ट्वेन्टी-20 सामने खेळले आहेत. इरफानने एकदिवसीय सामन्यांमध्ये 99 धावा आणि 8 बळी मिळवले आहेत, तर ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये त्याने 76 धावा आणि 11 बळी मिळवले आहेत.

टॅग्स :मॅच फिक्सिंगआयसीसी