पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा हिचा माजी पती शोएब मलिक हा संसाराच्या खेळपट्टीवर सातत्याने अपयशी ठरताना दिसत आहे. आता शोएब मलिक आणि त्याची तिसरी पत्नी सना जावेद यांच्या नात्याता दुरावा आला असून, हे दोघेही वेगळे होणार असल्याचं वृत्त आहे.
भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्यासोबतचे वैवाहिक संबंध संपुष्टात आणत घटस्फोट घेतल्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक यानं पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केलं होतं. सना जावेद हिचं हे दुसरं, तर शोएब मलिकचं हे तिसरं लग्न होतं. मात्र आता हे लग्नही मोडण्याच्या मार्गावर असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. शोएब मलिक आणि सना जावेद हे वेगळे होणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र शोएब मलिक आणि सना जावेद यांच्यापैकी कुणीही या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही.
पहिलं लग्न अल्पकाळात मोडल्यानंतर शोएब मलिक याने भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्यासोबत २०१० मध्ये दुसरं लग्न केलं होतं. अनेक वर्षे हे दोघेही एकत्र होते. मात्र काही वर्षांपूर्वी त्यांच्या नात्यात दुरावा आला. तसेच त्यांनी घटस्फोट घेतला. शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांना एक मुलगाही आहे, सध्या त्याचं पालन पोषण सानिया मिर्झा करत आहे. दरम्यान, सानिया मिर्झासोबत घटस्फोट झाल्यानंतर शोएब मलिकने सना जावेद हिच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. तर आता दोघेही घटस्फोट घेण्याच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात येत आहे.