भारतीय संघाचा माजी क्रिकेटर शिखर धवन याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो लीग मॅचेस अन् सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट आहे. चॅम्पिन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड नावे असलेल्या शिखर धवननं ऑगस्ट २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. डावखुऱ्या हाताच्या या फलंदाजाने आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक दमदार इनिंगसह यशाच शिखर गाठलं. आता त्याने क्रिकेटच्या प्रवासातील जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. जाणून घेऊयात क्रिकेटरनं शेअर केलेल्या क्रिकेटच्या प्रवासातील फिल्डवरील पडद्यामागची खास गोष्ट
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गब्बरनं दिला क्रिकेट फिल्डवरील जुन्या आठवणींना उजाळा शिखर धवन फाउंडेशनच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन स्टार माजी क्रिकेटरचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात तो आपल्या क्रिकेट प्रवासातील सुरुवातीचे अनुभव आणि आठवणींना उजाळा देताना दिसतोय. बच्चे कंपनीसोबत गप्पा गोष्ट करताना धवनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात कशी झाली यावर भाष्य केले. क्रिकेटच्या मैदानात पाऊल टाकल्यावर वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर पहिली स्पर्धा खेळायला मिळाली. १० मिनिटे बॅटिंग करण्यासाठी काय काय करावे लागायचे यासंदर्भातील किस्साही त्याने यावेळी शेअर केलाय.
काय म्हणाला शिखर धवन?
मी लहान असतानाच एका क्लबकडून खेळायला सुरुवात केली. क्लब जॉइन केल्यावर एक वर्षांची प्रतिक्षा केल्यावर पहिली स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली. या वर्षभराच्या काळात वेगवेगळी कामे केली. ज्यात पिच तयार करण्यापासून ते कोच मंडळींना चहा आणून देण्यापर्यंतच्या कामाचा समावेश होता. किमान १० मिनिटे तरी बॅटिंग मिळावी यासाठी तासन् तास उन्हात उभे राहून काम करायचो. असा किस्साही त्याने शेअर केला आहे.
शिखर धवनची कारकिर्द
डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणाऱ्या शिखर धवन याने २०१० मध्ये आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने पहिला सामनाखेळला होता. आपल्या कारकिर्दीत त्याने टीम इंडियाकडून १६७ वनडे सामने खेळले.य यात ४४.११ च्या सरासरीनं त्याने ६७९३ धावा केल्या. यात १७ शतकांसह ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. २०१३ मध्ये भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात धवननं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. याशिवाय ३४ कसोटी सामन्यात ७ शतके आणि ५ अर्धशतकासह त्याने २३१५ धावा केल्या असून आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ६८ सामन्यात त्याच्या खात्यात १७५९ धावा जमा आहेत.