Join us

Shikhar Dhawan Dropoped, IND vs SL: 'टीम इंडिया'तून वगळल्यावर शिखर धवनची भावनिक पोस्ट, नंतर केली डिलीट, कारण काय?

धवनला संघात स्थान मिळाल्याने त्याने नाराजी व्यक्त केली होती पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 00:16 IST

Open in App

Shikhar Dhawan Dropoped, IND vs SL: श्रीलंकेविरुद्धच्या टी२० आणि वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. या संघात भारतीय टी२० संघाचे कर्णधार हार्दिक पांड्याकडे देण्यात आले. तर रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल या तिघांना संघातून वगळण्यात आले. वन डे मालिकेत मात्र रोहितलाच संघाच्या कर्णधारपदावर कायम ठेवण्यात आले आहे. पण या साऱ्या गोष्टींमध्ये धक्कादायक बाब म्हणजे, शिखर धवनला वनडे संघातून वगळण्यात आले. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याची कामगिरी चांगली नव्हती, पण त्याच्यासारख्या वरिष्ठ खेळाडूला संघाबाहेर ठेवल्याने आता त्याचे करियर संपुष्टात आले आहे का, अशा चर्चाही सुरू झाल्या आहेत. पण याच दरम्यान, संघाच्या घोषणेनंतर शिखर धवनने प्रथमच प्रतिक्रिया दिली पण त्यानंतर ती डिलीटही केली.

शिखर धवन काही काळ एकदिवसीय संघाचा भाग होता. ज्या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली किंवा केएल राहुल नव्हते, त्या मालिकेत फक्त शिखर धवन टीम इंडियाचा कर्णधार होता. असे मानले जात होते की २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत शिखर धवन आणि रोहित शर्मा ही जोडीच सलामी करेल. परंतु अलीकडच्या काळात शिखर धवनच्या फॉर्मने त्याला साथ दिली नाही आणि बांगलादेश मालिकेतील अपयशानंतर त्याला वनडे संघातून वगळण्यात आले. त्यानंतर बुधवारी शिखर धवनने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. त्यामध्ये तो व्यायाम करताना दिसला. शिखर धवनने असे लिहिले की, विजय असो किंवा पराभव असो, त्यापैकी मनाला काहीच लावून घ्यायचे नाही. त्याउलट आपण आपलं काम करत राहायचं आणि बाकी सगळं देवावर सोडायचं. मात्र काही वेळाने त्याने ती पोस्ट डिलीट केली.

शिखरने पोस्ट अपलोड केल्यानंतर त्याला ८० हजारांहून अधिक लाइक्स मिळाले होते. असे असूनही त्याने पोस्ट डिलीट का केली याचे कारण समजू शकलेले नाही. आपल्या पोस्टमधून BCCI किंवा निवड समिती नाराज होऊ नये, किंवा चुकीचा अर्थ काढला जाऊ नये यासाठी ती पोस्ट डिलीट करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत शिखर धवनने केवळ ७, ८, ३ धावा केल्या. जर आपण त्याचा वन डे कारकीर्द पाहिली तर त्याने १६७ वन डे सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ४४ च्या सरासरीने ६,७९३ धावा आहेत. शिखर धवनच्या नावावर १७ शतके आहेत. त्याच वेळी, त्याने ३४ कसोटी सामन्यांमध्ये कसोटीत ४०च्या सरासरीने २ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाशिखर धवनभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयबांगलादेश
Open in App