ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यर गंभीर जखमी झाला. अॅलेक्स कॅरीचा उत्कृष्ट झेल घेण्याच्या प्रयत्नात अय्यरच्या बरगड्यांना दुखापत झाली होती. तपासणीनंतर त्याला 'प्लीहाची दुखापत' झाल्याचे निदान झाले असून, सध्या त्याच्यावर सिडनी येथील रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने सध्या आयसीयूमध्ये असलेल्या अय्यरसाठी एक भावनिक संदेश शेअर केला.
शनिवारी झालेल्या सामन्यात, बॅकवर्ड पॉइंटवर क्षेत्ररक्षण करत असताना अय्यरने धाव घेत अॅलेक्स कॅरीचा एक शानदार झेल घेतला. मात्र, याच दरम्यान त्याला दुखापत झाली. ड्रेसिंग रूममध्ये परतल्यानंतर त्याला लगेच रुग्णालयात हलवण्यात आले. सोमवारी बीसीसीआयने अधिकृत निवेदन जारी करून अय्यरच्या दुखापतीबद्दल माहिती दिली. "श्रेयस अय्यरच्या डाव्या बरगडीला दुखापत झाली, पुढील तपासणीसाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्कॅनमध्ये प्लीहाची दुखापत झाल्याचे दिसून आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्याची प्रकृती स्थिर असून तो बरा होत आहे." बीसीसीआयची वैद्यकीय टीम सिडनी आणि भारतातील तज्ञांशी सल्लामसलत करून त्याच्या दुखापतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
अय्यर सध्या आयसीयूमध्ये असल्याने, त्याचे सहकारी खेळाडूही त्याच्याबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. शिखर धवनने सोशल मीडियावर एक भावनिक संदेश शेअर केला. धवनने लिहिले की, "श्रेयस अय्यर, तू त्या कॅचसाठी सर्वस्व पणाला लावलेस. तुला दुखापत झालेले पाहून वाईट वाटले. तू लवकरात लवकर बरा व्हावा, अशी प्रार्थना करतो "
श्रेयस अय्यरवर उपचार सुरू
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यर दोन ते सात दिवस निरीक्षणाखाली ठेवले जाईल. भारतात परतण्यासाठी तंदुरुस्त घोषित होण्यापूर्वी त्याला किमान एक आठवडा सिडनीच्या रुग्णालयात निरीक्षणाखाली राहावे लागणार आहे. दरम्यान, श्रेयस अय्यर हा आगामी टी२० मालिकेचा भाग नाही.