रणजी करंडक स्पर्धेतील सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील सामने देशभरातील वेगवेगळ्या मैदानात खेळवण्यात येत आहेत. एका बाजूला सर्वांच्या नजरा रणजी मॅच खेळणाऱ्या टीम इंडियातील स्टार खेळाडूंवर खिळल्या असताना दुसऱ्या बाजूला देशांतर्गत क्रिकेटमधील अनुभवी विकेट किपर बॅटरनं विक्रमी कामगिरी करुन दाखवली आहे. राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर सौराष्ट्र विरुद्ध आसाम यांच्यातील सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात शेल्डन जॅक्सन याने रणजी स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावे केलाय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रणजी स्पर्धेतील नवा सिक्सर किंग, नमन ओझाचा विक्रम मोडला
रणजी करंडक स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा आधीचा विक्रम हा नमन ओझाच्या नावे होता. त्याचा विक्रम मोडित काढत शेल्डन जॅक्सन रणजी मॅचमधील नवा सिक्सर किंग ठरला आहे. शंभराव्या रणजी सामन्यात शेल्डन याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. आसाम विरुद्धच्या लढतीत सौराष्ट्र संघाकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यावर त्याने राहुल सिंहच्या गोलंदाजीवर सिक्सर मारत नवा विक्रम आपल्या नावे केला.
सौराष्ट्र संघाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर
नमन ओझानं रणजी मॅचेसमध्ये १४३ सिक्सर मारले आहेत. १०० वा रणजी सामना खेळताना शेल्डन जॅक्सन याने रणजीत सर्वाधिक सिक्सरचा विक्रम आपल्या नावे केला. जॅक्सन हा सौराष्ट्र संघाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चेतेश्वर पुजारा आणि सितांशू कोटक यांच्यापाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर आहे.
'फर्स्ट क्लास' क्रिकेटमधील कामगिरी
शेल्डन जॅक्सन याने २१ प्रथम श्रेणी सामन्यात १९ शतके झळकावली आहेत. २०११-१२ च्या हंगामात प्रथम श्रेणीमध्ये पदार्पण करणाऱ्या जॅक्सनच्या खात्यात ७००० हून अधिक धावांची नोंद आहे. २०१९-२० च्या हंगामात सौराष्ट्र संघाने रणजी ट्रॉफी उंचावली होती. या चॅम्पियन संघाचा शेल्डनही सदस्य होता. संघाला जेतेपद मिळवून देण्यासाठी त्याने बहुमूल्य कामगिरी बजावली होती. या हंगामात त्याने ५० पेक्षा अधिकच्या सरासरीसह ८०९ धावा कुटल्या होत्या.