Shardul Thakur Ajinkya Rahane Mumbai Ranji Trophy Semifinal : रणजी ट्रॉफीचा तिसरा क्वार्टर फायनल सामना मुंबई आणि हरयाणा संघांमध्ये खेळवण्यात आला. कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई संघाने विजय मिळवत उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. या सामन्यात स्टार अष्टपैलू शार्दुल ठाकूर विजयाचा नायक ठरला. शार्दुल ठाकूरने अतिशय घातक गोलंदाजी केली आणि हरयाणा संघाला १५२ धावांनी पराभूत केले.
शार्दुल ठाकूरची भेदक गोलंदाजी
या सामन्यात शार्दुल ठाकूर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने एकूण ९ विकेट्स घेतल्या. सामन्याच्या पहिल्या डावात शार्दुल ठाकूरने १८.५ षटके टाकली आणि ६ फलंदाजांना बाद केले. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे हरियाणा संघ पहिल्या डावात फक्त ३०१ धावा करू शकला आणि मुंबईला आघाडी मिळविण्यात यश आले. त्याच वेळी, शार्दुल ठाकूरने दुसऱ्या डावातही शानदार कामगिरी केली. त्याने १० षटके गोलंदाजी केली आणि फक्त २६ धावा दिल्या आणि ३ विकेट घेतल्या. त्यामुळे सामन्याच्या शेवटच्या डावात हरयाणा संघ २०१ धावांवर गारद झाला.
अजिंक्य रहाणेची दमदार फलंदाजी
या सामन्यात मुंबई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय फायद्याचा ठरला. मुंबई संघाला पहिल्या डावात ३१५ धावा करण्यात यश आले. यादरम्यान तनुश कोटियनने सर्वाधिक ९७ धावा केल्या आणि शॅम्स मुलाणीनेही ९१ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरादाखल, हरयाणा संघ पहिल्या डावात ३०१ धावा करून सर्वबाद झाला. यानंतर, मुंबईने त्यांच्या दुसऱ्या डावात ३३९ धावा केल्या, ज्यामध्ये अजिंक्य रहाणेने १८० चेंडूत १०८ धावा केल्या. तसेच सूर्यकुमार यादवनेही या डावात ७० धावा केल्या. मुंबईकडून रॉयस्टन डायसने ५ विकेट्स घेतल्या आणि मुंबईने उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले.