नवी दिल्ली : देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळणारा स्टार अष्टपैलू शार्दुल ठाकूर हा आयपीएलमध्येही आता मुंबईकडून खेळताना दिसेल. लखनौ संघाने शार्दुलला आयपीएलच्या आगामी हंगामाआधी मुंबई इंडियन्सकडे २ कोटी रुपयांच्या मोबदल्यात ट्रेड करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू शेरफेन रूदरफोर्ड यालाही मुंबईने गुजरात संघाकडून ट्रेड केले आहे.
आयपीएलने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, ‘मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याला लखनौ संघाने आयपीएलच्या १८व्या हंगामात दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी २ कोटी रुपयांना घेतले होते. त्याने त्या हंगामात १० सामने खेळले होते. आता त्याला मुंबई संघाकडे २ कोटी रुपयांच्या फीवर हस्तांतर करण्यात आले आहे.’ ३२ वर्षीय ठाकूरने १०५ आयपीएल सामने खेळले असून, त्यात त्याने ३२५ धावा करताना १०७ बळी घेतले आहेत. गेल्या आयपीएल सत्रात लखनौने शार्दुलला दुखापतग्रस्त मोहसीन खानच्या जागी बदली खेळाडू म्हणून घेतले होते. शार्दुलने याआधी चेन्नई, दिल्ली आणि पंजाब या संघांचेही प्रतिनिधित्व केले आहे. दोन अष्टपैलू खेळाडूंना संघात घेतल्याने मुंबईची फळी मजबूत बनली आहे.
रूदरफोर्डसाठी मोजले २.६ कोटी रूपये
गुजरात संघाने वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू शेरफेन रूदरफोर्ड याला मुंबई संघाकडे २.६ कोटी रुपयांच्या मोबदल्यात ट्रेड केले आहे. आयपीएलने माहिती दिली की, ‘गुजरातने रूदरफोर्डला २.६ कोटी रुपयांना घेतले होते आणि आता त्याला त्याच रकमेवर त्यांनी मुंबईकडे हस्तांतरित केले आहे.’ २७ वर्षीय रूदरफोर्ड वेस्ट इंडिजसाठी ४४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. रूदरफोर्डने आतापर्यंत २३ आयपीएल सामने खेळले आहेत. त्याने २०१९ मध्ये दिल्ली, तर २०२२ मध्ये बंगळुरूचे प्रतिनिधित्व केले होते.