नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर खेळाडू मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) मोठ्या कालावधीपासून इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या द हंड्रेड लीगमध्ये (The Hundred Leauge) खेळत आहे. याच लीगमधील ओव्हल इनव्हिन्सिबल्सविरुद्धच्या सामन्यात मार्कस स्टॉयनिसने पाकिस्तानच्या गोलंदाजावर आक्षेप घेऊन नव्या वादाला निमंत्रण दिले होते. आता तोच वाद चिघळण्याची शक्यता आहे. कारण पाकिस्तानचा माजी दिग्गज शोएब अख्तर (Shoaib Akhtar)याने पाक गोलंदाजाची पाठराखण करत स्टॉयनिसला खडेबोल सुनावले आहे. तसेच स्टॉयनिसने केलेले हावभाव हे लज्जास्पद असल्याचे अख्तरने म्हटले.
दरम्यान, साउथर्न ब्रेव्हसाठी द हंड्रेड लीगमध्ये खेळत असलेल्या मार्कस स्टॉयनिसला पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद हसनैनने (Mohammad Hasnain) १४२ प्रति ताशी वेगाने चेंडू टाकून बाद केले. बाद झाल्यावर डगआउटमध्ये परतत असताना स्टॉयनिसने गोलंदाजाची ॲक्शन करून गोलंदाज फेकी गोलंदाजी करत आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला होता.
अख्तरने दिला इशारा
शोएब अख्तरने मंगळवारी ट्विटच्या माध्यमातून यावर प्रतिक्रिया देऊन निशाणा साधला आहे. अख्तरने लिहले आहे की, "मार्कस स्टॉयनिसने मोहम्मद हसनैनच्या गोलंदाजीवरून केलेले हावभाव लज्जास्पद आहेत. द हंड्रेड २०२२ मध्ये अशी गोष्ट करण्याची तुझी हिम्मत कशी झाली? आयसीसी देखील अद्याप यावर शांत आहे. जर एखाद्याला आधीच क्लिअर केले असेल तर कोणत्याही खेळाडूला अशा गोष्टी करण्याची परवानगी दिली जाऊ नये". अशा शब्दांत अख्तरने स्टॉयनिसचा चांगलाच समाचार घेतला.
स्टॉयनिसने केली होती नक्कल
स्टॉयनिसने पाकिस्तानच्या गोलंदाजी केलेली नक्कल सामना संपल्यानंतर चर्चेचा विषय बनली होती. मोहम्मद हसनैनच्या गोलंदाजीच्या ॲक्शनवर प्रश्न उपस्थित केले असले तरी स्टॉयनिसवर अधिकृतपणे कोणतीही कारवाई केली जाणार नाही असे सांगण्यात आले होते. क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, बाद झाल्यावर डगआउटमध्ये परतत असताना स्टॉयनिसने पाकिस्तानच्या गोलंदाजाची नक्कल केली होती. त्यामुळेच सामन्यातील पंचांनी त्याला बोलावले होते.
गोलंदाजाची नक्कल केली म्हणून नियमांचे उल्लंघन झाले असे नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे स्टॉयनिसवर कोणतीही कारवाई होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. लक्षणीय बाब म्हणजे बीग बॅश लीगमध्ये हसनैनला गोलंदाजीतून निलंबित करण्यात आले होते. मात्र जूनमध्ये त्याने नवीन ॲक्शनसह मैदानात पुनरागमन केले होते.
Web Title: Shameful gesture by Marcus Stoinis regarding bowling action of Mohammad Hasnain, says shoaib akhtar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.