Shama Mohamed: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मावर लठ्ठ म्हटल्यानंतर काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे शमा मोहम्मद यांना स्वतःच्या पक्षानेही त्यांना झापलं आहे. शमा मोहम्मद यांनाही भाजपच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनीही शमा मोहम्मद यांच्यावर टीका केली. सर्वच बाजूंनी टीका होत असताना शमा मोहम्मद यांनी पलटवार करत भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतची जुनी पोस्ट समोर आणत मंत्री मांडविया यांना प्रश्न विचारले आहेत.
रोहित शर्माच्या कार्यक्षमतेवर टिप्पणी केल्यानंतर काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. रोहित शर्माच्या चाहत्यांसह मंत्र्यांनीही याला बॉडी शेमिंग म्हणत शमा मोहम्मद यांच्यावर टीका केली. या टीकासत्रावरुन शमा मोहम्मद यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर कंगना राणौतच्या चार वर्ष जुन्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये कंगना राणौतने क्रिकेटर्सना धोबीका कुत्ता असं म्हटलं आहे.
२०२१ मध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान रोहित शर्मावर कंगनाने केलेल्या पोस्टकडे शमा मोहम्मद यांनी क्रीडा मंत्र्यांचे लक्ष वेधलं. "मांडविया जी, आता कंगना राणौतबद्दल काय म्हणाल? २०२१ मध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान रोहित शर्माने जेव्हा शेतकऱ्यांचे महत्त्व सांगून या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आवाहन केले होते, तेव्हा कंगना राणौतने त्यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. तेव्हा भाजप नेत्यांनी कंगना राणौतवर कारवाई का केली नाही," असं शमा मोहम्मद यांनी म्हटलं.
शेतकरी आंदोलनादरम्यान रोहित शर्माने एक पोस्ट केली होती जी कंगना रणौतला आवडली नाही.'शेतकरी आपल्या देशाचा एक भाग आहेत, ते आपल्या देशासाठी महत्त्वाचे आहेत आणि मला खात्री आहे की शेतकरी या समस्येवर नक्कीच काहीतरी तोडगा काढतील आणि प्रत्येकजण आपली भूमिका नक्कीच बजावेल, असं रोहित शर्माने म्हटलं होतं.
रोहित शर्माच्या या पोस्टवरर कंगनाने टीका केली होती. सगळे क्रिकेटर्स हे धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशा पद्धतीने का बोलत आहेत? शेतकरी त्यांच्या हितासाठी असलेल्या कायद्यांच्या विरोधात का जातील? हे दहशतवादी आहेत जे गोंधळ घालत आहेत. सांगून टाका ना तुम्हाला इतकी भीती वाटते का?, अशी प्रत्युत्तर कंगनाने दिलं होतं. मात्र काही वेळाने कंगनाने ही पोस्ट डिलीट केली. पण तोपर्यंत त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले होते.