Shahid Afridi on Rohit Sharma new sixer king, IND vs SA: भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा याने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत एक मोठा विक्रम केला. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो जगात अव्वलस्थानी पोहोचला. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याच्या नावावर ३५१ षटकार होते. मालिका सुरु होण्यापूर्वी शाहिद आफ्रिदी अव्वलस्थानी होता. पण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या वनडेमध्ये रोहित शर्माने हा टप्पा ओलांडला. सध्या रोहित शर्माच्या नावावर ३५५ षटकार असून तो यादीत अव्वल आहे. आपला विक्रम मोडल्यानंतर शाहिद आफ्रिदीने रोहित शर्माबाबत प्रतिक्रिया दिली.
शाहिद आफ्रिदी काय म्हणाला?
"कुठलेही विक्रम हे मोडण्यासाठीच असतात. आता जो विक्रम मोडला गेलाय तो क्रिकेटच्या चांगल्यासाठीच मोडण्यात आला आहे. मला जो फलंदाज आवडतो त्या प्रतिभावान फलंदाजाने माझा विक्रम मोडला ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. IPLमध्ये डेक्कन चार्जर्ससाठी आम्ही दोघेही एकत्र खेळायचो. सराव सत्रात मी त्याची फलंदाजी बघितली आहे. त्याचवेळी मला त्याची प्रतिभा खूप भावली होती. रोहित शर्मा एक दिवस टीम इंडियासाठी खेळणार याची मला खात्री होती. ते खरे ठरले आणि रोहित शर्माने आपला दर्जा सिद्ध केला आहे," अशा शब्दांत शाहिद आफ्रिदीने रोहित शर्माची तोंडभरून स्तुती केली.
![]()
रोहित शर्माचा फिटनेस चर्चेत
IPL 2025 संपल्यानंतर बराच काळ रोहित शर्मा क्रिकेटपासून दूर होता. त्याचा फिटनेस हा चर्चेचा विषय ठरला होता. ऑस्ट्रेलिया मालिकेआधी रोहितने १० ते १५ किलो वजन घटवून साऱ्यांनाच थक्क केले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्याआधीही त्याने आणखी काही किलो वजन घटवून आपला फिटनेस दाखवून दिला. मालिका विजयानंतर संघाने केक कापून सेलिब्रेशन केले. यादरम्यान, यशस्वी जैस्वालने आधी विराट कोहलीला केक खाऊ घातला, त्यानंतर त्याने रोहितला हाक मारली. पण रोहितने हसत हसत म्हणाला की, मला केक नको, मी पुन्हा जाड होईन. रोहितसारख्या खेळाडूकडून अशी प्रतिक्रिया आल्याने सारेच जोरात हसू लागले.