Join us  

...म्हणूनच मी सर्वात धाडसी निर्णय घेतला; शाहीन आफ्रिदीने सांगितलं इम्रान खान कनेक्शन

पाकिस्तान सुपर लीगच्या यंदाच्या हंगामाला सुरूवात होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 3:56 PM

Open in App

PSL 2024: शनिवारपासून पाकिस्तान सुपर लीगच्या यंदाच्या हंगामाला सुरूवात होत आहे. आयपीएलच्या धर्तीवर पाकिस्तानात पाकिस्तान सुपर लीग ही स्पर्धा आयोजित केली जाते. पुढील काही दिवस सहा संघ एका ट्रॉफीसाठी मैदानात असणार आहेत. गतविजेत्या लाहोर कलंदर्सच्या संघाचा कर्णधार शाहीन आफ्रिदीने स्पर्धेच्या सुरूवातीला एक मोठे विधान केले आहे. खरं तर शाहीनने माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे कौतुक केले. तसेच कर्णधारपद स्वीकारण्यामागे त्यांनीच दिलेला सल्ला कारणीभूत होता असे त्याने म्हटले आहे.

शाहीनने सांगितले की, त्याला कर्णधार होण्यात कधीच रस नव्हता. पण कर्णधार म्हणून पीएसएलमध्ये शाहीन आफ्रिदीचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे आणि गेल्या दोन हंगामात लाहोर कलंदर्सला जेतेपद मिळवून देण्यात तो यशस्वी ठरला आहे. माजी कर्णधार अन् माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी शाहीन आफ्रिदीला कर्णधार होण्याचा सल्ला दिला होता, असे आफ्रिदीने सांगितले. तो म्हणाला की, मला कर्णधार बनण्यात कधीच रस नव्हता. त्यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान असलेले इम्रान खान यांनी लाहोर कलंदर्सने मला कर्णधार बनवावे, असा सल्ला दिला होता. मला कर्णधार बनवण्याचा निर्णय इम्रान खान यांच्या सल्ल्यानंतरच घेण्यात आला. 

पाकिस्तान सुपर लीगचा थरार दरम्यान, पाकिस्तान सुपर लीगमध्ये मागील दोन हंगामात शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वातील लाहोर कलंदर्सने किताब जिंकला. त्यामुळे शाहीन आफ्रिदीचे लक्ष आता सलग तिसरे विजेतेपद पटकावण्यावर असेल. "लाहोरला सलग तिसऱ्या मोसमात विजेतेपद मिळवून देण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. आम्हाला विजेतेपदाची हॅटट्रिक मारायची आहे. आम्ही मागील दोन हंगामात ज्या उत्साहाने खेळलो त्याच उत्साहाने खेळणार आहोत. गेल्या दोन हंगामात आम्ही जे केले तेच आम्हाला करायचे आहे. लाहोर संघ खूप मजबूत आहे आणि आम्हाला चाहत्यांचा भक्कम पाठिंबा आहे", असे शाहीनने नमूद केले.

येत्या जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान या विश्वचषकात सहभागी होणार आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधारपदाची सुरुवात शाहीनसाठी चांगली झाली नाही. शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्ध ४-१ ने पराभवाचा सामना करावा लागला.  

टॅग्स :पाकिस्तानइम्रान खानटी-20 क्रिकेट