Join us

भारताच्या 15 वर्षीय महिला क्रिकेटपटूनं मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम

भारतीय महिला संघाने वन डे मालिका खिशात घातल्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेची सुरुवातही धडाक्यात केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2019 15:37 IST

Open in App

भारतीय महिला संघाने वन डे मालिका खिशात घातल्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेची सुरुवातही धडाक्यात केली. पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात भारतीय महिलांनी 84 धावांनी विजय मिळवल पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात 15 वर्षीय शेफाली वर्मानं 49 चेंडूंत 73 धावा केल्या. या कामगिरीसह तिनं महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेल्या दीर्घकालीन विक्रम मोडण्याचा पराक्रम केला.

प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिलांनी 20 षटकांत 4 बाद 185 धावा केल्या. शेफाली आणि स्मृती मानधना यांनी पहिल्या विकेटसाठी 143 धावा जोडल्या. शेफालीनं 6 चौकार व 4 षटकार खेचून 73 धावा केल्या. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील हे तिचे पहिलेच अर्धशतक ठरले. स्मृतीनं 46 चेंडूंत 11 चौकारांसह 67 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौर ( 21) आणि वेदा कृष्णमुर्ती ( 15*) यांनी छोटेखानी महत्त्वाच्या खेळी केल्या. 

लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला 9 बाद 101 धावा करता आल्या. शेमैन कॅम्प्बेल ( 33) वगळता विंडीजच्या फलंदाजांना मोठी खेळी करण्यापासून भारतीय गोलंदाजांनी रोखले. शिखा पांडे, राधा यादव आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. पण, या सामन्यात शेफालीनं तेंडुलकरचा विक्रम मोडला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक झळकावण्याचा तेंडुलकरचा विक्रम शेफालीनं रविवारी मोडला. सचिननं 16 वर्ष व 213 दिवसांचा असताना कसोटीत पहिले अर्धशतक झळकावले होते. शेफालीनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये रविवारी पहिले अर्धशतक झळकावले. तिनं 15 वर्ष व 285 दिवसांची असताना ही अर्धशतकी खेळी केली.  

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघभारतवेस्ट इंडिजसचिन तेंडुलकर