भारताची युवा स्फोटक बॅटर आणि लेडी सेहवाग या नावाने ओळखली जाणारी शफाली वर्मानं कमाल केली आहे. महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत अगदी शेवटच्या टप्प्यात संधी मिळाल्यावर एका मॅचमधील धमाकेदार कामगिरीच्या जोरावर तिने ICC चा पुरस्कार जिंकला आहे. आयसीसीकडून शफाली वर्माला नोव्हेंबर २०२५ चा ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शफाली वर्मा ही भारतीय महिला संघाकडून तिन्ही प्रकारात खेळली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
महिला वर्ल्ड कप स्पर्धेत वाइल्ड कार्ड एन्ट्री, फायनलमध्ये बॅटिंगसह बॉलिंगमध्ये ठरली भारी अन्...
महिला वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने पहिली वहिली वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली. या स्पर्धेसाठी शफाली वर्माची टीम इंडियात निवडच झाली नव्हती. पण सेमीफायनल आधी कमालीची कामगिरी करणारी प्रतिका रावल दुखापतग्रस्त झाली. तिच्या जागी शफाली वर्माला टीम इंडियात वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळाली. या संधीचं सोनं करताना शफालीनं फायनलमध्ये ७८ चेंडूत ८७ धावांची जबरदस्त खेळी केली. एवढेच नाही तर गोलंदाजीत २ महत्त्वाच्या विकेट्स मिळवत तिने संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. याच एका मॅचमधील कामगिरीच्या जोरावर आयीसीसीने तिला महिन्यातील सर्वोत्तम महिला खेळाडूच्या रुपात सन्मानित केले आहे.
T20I मध्ये पहिल्या बॉलवर सिक्सर मारण्यात अभिषेक शर्मा माहिर! शाहीन आफ्रिदीलाही नाही सोडलं
शफाली वर्माची प्रतिक्रिया
ICC चा पुरस्कार जिंकल्यावर शफाली म्हणाली की, "फायनलमध्ये संघाच्या यशात योगदान देऊ शकले, हे भाग्याचं आहे. संधी दिल्याबद्दल मी BCCI ची खूप आभारी आहे. पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकण्याच्या ऐतिहासिक क्षणाचा भाग बनता आलं, याचा मला अभिमान वाटतो. 'प्लेयर ऑफ द मंथ’ हा पुरस्कार मी माझ्या संघसहकाऱ्यांना, प्रशिक्षकांना, कुटुंबाला आणि माझ्या प्रवासात साथ देणाऱ्या सर्वांना समर्पित करते."
संघातून वगळण्यात आल्यावर देशांतर्गत क्रिकेटमध्ये दाखवली धमक
शफाली वर्मानं आतापर्यंत भारताकडून कसोटीत ५६७ धावा केल्या आहेत. वनडेत तिच्या खात्यात ३१ सामन्यांत ७४१ धावा जमा असून ९० टी-२० सामन्यात तिने २२२१ धावा केल्या आहेत. संघाच्या डावाला स्फोटक अंदाजात सुरुवात करुन देण्याची क्षमता असलेल्या शफालीला कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. खचून न जाता तिने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मेहनत घेतली. इथं आपल्यातील क्षमता सिद्ध केल्यामुळे तिला प्रतिकाच्या जागी वर्ल्ड कपच्या बाद फेरीतील सामन्यात थेट संघात स्थान मिळाले. या संधीचं सोनं करताना तिने ही स्पर्धा गाजवल्याचे पाहायला मिळाले.