Shafali Verma funny cricket story: भारतीय महिला संघाने आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून पहिल्यांदाच विश्वचषक ट्रॉफी जिंकली. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये खेळल्या गेलेल्या विजेतेपदाच्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला. भारतीय महिला संघ २००५ आणि २०१७ च्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाला होता, परंतु यावेळी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली, टीम इंडियाने अंतिम सामना जिंकला. त्यामुळे देशभरातील चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधी मिळाली. सामन्यात शेफाली वर्माने शानदार अष्टपैलू कामगिरी करत सामनावीराचा किताब जिंकला. तिने आपल्या सुरुवातीच्या क्रिकेट कारकिर्दीचा एक किस्सा सांगितला.
भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळले...
"मी मुलांसोबत खेळले याचा मला आनंद आहे. तो अनुभव आजपर्यंत माझ्यासाठी उपयुक्त ठरला आहे. माझ्या कुटुंबानेही माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला मुलांसोबत खेळण्याची परवानगी दिली. माझा भाऊ एका स्पर्धेत खेळणार होता, पण तो आजारपणामुळे जाऊ शकला नाही. मी माझ्या वडिलांना सांगितले की मी जाऊन खेळेन म्हणजे मला चांगला सराव मिळेल. माझ्या वडिलांनी परवानगी दिल्यावर मी माझ्या भावाचा 'साहिल' नावाचा टी-शर्ट घालून खेळले. त्यामुळे मला खूप आत्मविश्वास मिळाला आणि सगळंच बदलून गेलं. तो पुरस्कार अजूनही माझ्या घरी आहे," अशी आठवण शेफाली वर्माने आजतकच्या कार्यक्रमात सांगितले.
वर्ल्डकप फायनलला अचानक संधी
फायनलच्या सामन्यात शेफाली वर्माने शानदार अष्टपैलू कामगिरी केली. तिला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. तिने ८७ धावांची दमदार खेळी केली आणि दोन महत्त्वपूर्ण विकेटही घेतल्या. शेफाली सुरुवातीला भारतीय विश्वचषक संघाचा भाग नव्हती, परंतु सलामीवीर प्रतीका रावल जखमी झाल्यानंतर तिला भारतीय संघात समाविष्ट करण्यात आले. संघातील जेमिमा रॉड्रिग्ज आणि दीप्ती शर्मा यांनीही चांगली खेळी केली होती. पण शेफालीला अचानक संधी मिळाली आणि तिने त्याचे सोने केले.