भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) यानं त्याच्या फुल टाइम प्रशिक्षकपदाची सुरुवात दणक्यात केली. टीम इंडियानं ट्वेंटी-२० मालिकेत न्यूझीलंडवर ३-० असा विजय मिळवला. आता गुरुवारपासून कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. दी वॉल राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर भारतीय क्रिकेट सुरक्षित हातात गेल्याची भावना सर्वांच्या मनात निर्माण झाली आहे. अशात राहुल द्रविडच्या हातात नेहमी दिसणाऱ्या डायरीची चर्चा सुरू झाली आहे. मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर द्रविडच्या सतत ती डायरी दिसतेय. असं काय आहे द्रविडच्या त्या डायरीत?; याचे उत्तर भारतीय संघातील २४ वर्षीय खेळाडूनं दिलं आणि ते जाणून राहुलप्रती असलेला आदर आणखी वाढला.
स्टार स्पोर्ट्स वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत २४ वर्षीय गोलंदाज आवेश खान यानं त्यामागचं रहस्य सांगितले. त्यानं द्रविडच्या हातात दिसणाऱ्या डायरीत नेमकं काय आहे तेही सांगितलं. आवेश म्हणाला, राहुल द्रविड सर त्यांच्या डायरीत त्यांच्याकडून किंवा संघातील खेळाडूंकडून झालेल्या चुका लिहितात. चूकाच नाही तर चांगल्या कामाचिही नोंद केली जाते. त्यानंतर संघाच्या बैठकीत त्या नोट्स वाचून दाखवून ते खेळाडूंना योग्य मार्गदर्शन करतात आणि चूक कशी सुधारता येईल, याबाबत सल्ले देतात.
पाहा व्हिडीओ...
आवेश म्हणाला, '' राहुल द्रविड सर म्हणतात की, चुका सर्वांकडून होतात, परंतु त्यात सुधारणा करणे महत्त्वाचे आहे. पुढील सामन्यात मागचीच चूक परत करता कामा नये. आपल्या चुकांतून शिका आणि एक उत्तम क्रिकेटपटू बना.''