अल अमरात : ओमान आणि स्कॉटलंड संघांनी मंगळवारी 50-50 षटकांच्या सामन्यांत विक्रमाला गवसणी घातली. या सामन्यात स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडले आणि ओमानच्या संघाचा संपूर्ण डाव 17.1 षटकांत अवघ्या 24 धावांवर गुंडाळला. स्कॉटलंडने विजयासाठीचे 25 धावांचे लक्ष्य अवघ्या 3.2 षटकात एकही विकेट न गमावता पार केले. लिस्ट A क्रिकेटमधील ही चौथी नीचांक खेळी ठरली.
ओमान दौऱ्यावर आलेल्या स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून यजमान संघाला फलंदाजीचे निमंत्रण दिले. सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर अलस्डेर इव्हान्सने दुसऱ्याच चेंडूवर जतिंदर सिंगला ( 0 ) बाद केले. पुढच्याच षटकात रुईध्री स्मिथने ट्विंकल भंडालीला भोपळ्यावर माघारी पाठवले. ओमान संघाची सुरू झालेली पडझड पुढे थांबलीच नाही. खावर अली ( 15) वगळता ओमानच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. ओमानच्या सहा फलंदाजांना तर भोपळाही फोडता आला नाही. स्कॉटलंडच्या स्मिथने 8 षटकांत 7 धावा देत 4 विकेट घेतल्या, तर अॅड्रीयन नेलनेही 4.1 षटकांत 7 धावांत 4 फलंदाज बाद केले. इव्हान्सला 2 विकेट घेण्यात यश मिळाले.
![]()
स्कॉटलंडने हे माफक लक्ष्य अवघ्या 3.2 षटकांत पूर्ण केले. मॅथ्यू क्रॉस (10) व कायले कोएत्झर ( 16) यांनी स्कॉटलंडला सहज विजय मिळवून दिला. ओमानची ही लिस्ट A क्रिकेटमधील चौथी नीचांक खेळी आहे. या नकोशा विक्रमता वेस्ट इंडिजचा 19 वर्षांखालील संघ आघाडीवर आहे. 2007 मध्ये बार्बाडोस संघाने विंडीजच्या 19 वर्षांखालील संघाचा संपूर्ण डाव 18 धावांत गुंडाळला होता. त्यानंतर सॅरॅसेन्स एससीचा ( 19 धावा, वि. कोल्ट्स एससी, 2012) आणि मिडलेसेस्क ( 23 धावा, यॉर्कशायर, 1974) यांचा क्रमांक येतो.
![]()
याआधी स्कॉटलंडने ट्वेंटी-20 मालिकेत ओमानचा पराभव करत बाजी मारली. या कामगिरीच्या जोरावर त्यांनी
आयसीसी क्रमवारीत 22 व्या स्थानांनी सुधारणा केली. ओमानचे 111 धावांचे लक्ष्य स्कॉटलंडने 15.3 षटकांत 3 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले.