नवी दिल्ली : ‘भारतीय क्रिकेटमधील उल्लेखनीय बदलाचे खरे श्रेय जाते ते माजी कर्णधार आणि भावी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीलाच. सौरवकडे नेतृत्व येण्याआधी भारतीय संघ पाकिस्तानवर मात करण्यास कधीही मानसिकदृष्ट्या सक्षम नव्हता,’ असे पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने म्हटले.
शोएब म्हणतो, ‘मी सौरवसोबत बराच वेळ घालविला आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएल खेळताना तो माझा कर्णधार होता. सौरवने खऱ्या अर्थाने भारतीय क्रिकेटमध्ये बदल घडवला. त्याने संघाची मानसिकता बदलली. त्याच्याकडे नेतृत्व येण्याआधी भारत पाकला हरवू शकतो, असे मला कधीही जाणवले नाही.’
एका व्हीडिओमध्ये शोएब पुढे म्हणाला, ‘सौरवमध्ये गुणवत्ता ओळखून संधी देण्याची क्षमता होती. हरभजन, सेहवाग, झहीर व युवराज या सर्व खेळाडूंना सौरवने पुढे आणले. या सर्व खेळाडूंचा समावेश असलेला वेगळा भारतीय संघ मी बघितला. या संघात पाकिस्तानवर मात करण्याच्या मानसिकतेचा संचार झाला. या संघाने २००४ मध्ये पाकिस्तानात पाकिस्तानविरुद्ध मालिका विजय मिळविला. ही मोठी घटना होती.’
अख्तर म्हणाला, ‘गांगुलीत शानदार नेतृत्वक्षमता आहे. क्रिकेट नसानसात भिनले असल्याने त्याला बारकावे ठाऊक आहेत. त्याने भारतीय क्रिकेटला जमिनीवरुन आकाशात भरारी घेण्याइतपत बनविले.’