पाकिस्तान क्रिकेट संघातील खेळाडू आणि बोर्डाचा कारभार सर्वच सध्याच्या घडीला नकारात्मक गोष्टींमुळे चर्चेत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमानपद मिरवताना एकही सामना न जिंकता साखळी फेरीतच संघाचा प्रवास संपुष्टात आला. पाक संघावर ही वेळ का आली? खेळाडू नेमकं कुठं कमी पडताहेत? क्रिकेट बोर्डाचं काय चुकतंय का? असे अनेक प्रश्न चर्चेत असताना पाकिस्तान देशांतर्गत क्रिकेटमधील एक अजब गजब प्रकार समोर आला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघातील स्टार खेळाडू सौद शकील याच्यावर देशांतर्गत क्रिकेटमधील सामन्यात 'टाइम्ड आउट' होण्याची नामुष्की ओढावलीये. ड्रेसिंग रुममध्ये डुलक्या काढल्यामुळे त्याने नकोसा विक्रम आपल्या नावे करून घेतलाय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
झोप नडली अन् विकेट गमावली.. पाकच्या स्टार खेळाडूची फजिती
क्रिकेटच्या मैदानात फलंदाजी करणाऱ्या संघाची विकेट पडल्यावर निर्धारित वेळ दुसरा फलंदाज क्रिजमध्ये पोहचावा लागतो. जर वेळेत फलंदाज क्रिजमध्ये आला नाही तर 'टाइम्ड आउट'च्या नियमानुसार फलंदाजाला बाद दिले जाते. पाकिस्तान खेळाडू त्याचा नियमामुळे आउट झाला. आता हा पाकिस्तानी खेळाडू 'टाइम्ड आउट' होण्यामागचं कारण ही विचित्रच आहे. कारण झोपेच्या नादात हे सगळं घडलं. समोर येणाऱ्या वृत्तानुसार, मॅच सुरु असताना सौद शकील झोप काढत होता. त्यामुळेच त्याला क्रिजमध्ये पोहचण्यास वेळ झाला अन् त्याने नाहक आपली विकेट गमावली. पाकिस्तान क्रिकेटमध्ये 'टाइम्ड आउट' होणारा तो पहिला पाकिस्तानी क्रिकेटरही ठरला आहे. ही घटना पाकिस्तानी क्रिकेटची अवस्था बिकट का होत आहे, त्याचं एक उदाहरणच आहे. गेम बद्दल गांभिर्य नसेल तर त्यात तुम्ही भारी कधीच ठरू शकणार नाही, हेच यातून दिसून येते.
लागोपाठ दोन विकेट पडल्यावर आला अन् चेंडू न खेळता विकेट गमावून गेला
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सौद शकील पाकिस्तान संघाचा भाग होता. संघ स्पर्धेत आउट झाल्यावर या क्रिकेटरने रावळपिंडीतील देशांतर्गत क्रिकेटमधील प्रेसिडेंट ट्रॉफी स्पर्धेतील फायनल सामन्यासाठी तो स्टेट बँक ऑफ पाकिस्तान संघात सामील झाला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यावर वेळेत क्रिजमध्ये न पोहचल्यामुळे त्याला 'टाइम्ड आउट' देण्यात आले. लागोपाठ दोन विकेट पडल्यावर सौद शकीलने क्रिजमध्ये येण्यासाठी तीन मिनिटांपेक्षा अधिक वेळ घेतला. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनी अपील केल्यामुळे पंचांनी त्याला आउट दिले.
३ चेंडूत ४ विकेट्सचा सीन
या सामन्यात सौद शकील फलंदाजीला येण्याआधी गोलंदाजाने बॅक टू बॅक दोन विकेट्स घेतल्या होत्या. तो टाइम्ड आउट होऊन माघारी परतल्यावर दुसरा फलंदाज मैदानात आला. तोही बाद झाला. त्यामुळे गोलंदाजाने हॅटट्रिकचा डाव साधलाच. पण या हॅटट्रिकच्या दरम्यान सौद शकीलच्या रुपात मिळालेल्या विकेटमुळे ३ चेंडूत ४ फलंदाजा बाद झाल्याचा कमालीचा सीन पाहायला मिळाला.