मुंबई : सरफराज खानला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी भारत ‘अ’ संघाच्या दौऱ्यांची किंवा मालिकांची गरज नाही. कारण, हा मधल्या फळीतील फलंदाज देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा मारा करून थेट भारतीय कसोटी संघात पुनरागमन करू शकतो, असे मुंबईचा कर्णधार शार्दूल ठाकूर याने म्हटले आहे.
२०२३-२४ मध्ये इंग्लंडविरुद्ध राजकोट कसोटीत भारताकडून पदार्पण करणारा सरफराज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कसोटी संघात होता; पण त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले.
भारतासाठी सहा कसोटी खेळलेला २८ वर्षीय सरफराज अलीकडेच दक्षिण आफ्रिका ‘अ’विरुद्ध भारत ‘अ’ मालिकेसाठीही निवडला गेला नाही. त्याने आपला शेवटचा कसोटी सामना मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता.
भारतीय अष्टपैलू आणि मुंबईचा कर्णधार शार्दूल ठाकूर म्हणाला की, आजकाल भारत ‘अ’ संघात त्याच खेळाडूंवर लक्ष दिले जाते, ज्यांना ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार करत आहेत. सरफराजला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी भारत ‘अ’ सामन्यांची गरज नाही. तो पुन्हा धावा करायला लागला, तर तो थेट कसोटी संघात परत येऊ शकतो.
शार्दूलने केला बचाव
रणजी सत्रातील मुंबईच्या पहिल्या सामन्यात जम्मू-काश्मीरविरुद्ध चांगली सुरुवात करूनही ती मोठ्या खेळीत रूपांतरित करू न शकलेल्या सरफराजचा बचाव करताना शार्दूल म्हणाला की, तो सध्या दुखापतीतून परत येतो आहे; पण त्याआधी त्याने बुची बाबू ट्रॉफीत दुखापत होण्यापूर्वी दोन-तीन शतके झळकावली होती. मुंबईने या सामन्यात पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरवर विजय मिळवला.