Join us
Daily Top 2Weekly Top 5

आगामी ट्वेंटी-20 मालिकेतून रिषभ पंतचा पत्ता कट? द्विशतकवीर यष्टिरक्षकाला मिळणार संधी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरी कसोटी उद्यापासून सुरू होत आहे. या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघ आठवडाभर सुट्टीवर जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 10:12 IST

Open in App

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरी कसोटी उद्यापासून सुरू होत आहे. या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघ आठवडाभर सुट्टीवर जाणार आहे. त्यानंतर टीम इंडियाचा सामना करण्यासाठी बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. तीन ट्वेंटी-20 आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी लवकरच टीम इंडियाची निवड केली जाणार आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी विश्रांतीवर असल्यानं त्याचे या मालिकेतही खेळणे जवळपास अशक्यच आहे. त्यामुळे रिषभ पंत हा संघासाठी यष्टिरक्षक म्हणून पर्याय असू शकतो, असे तुम्हाला वाटेल. पण, पंतचाही पत्ता कट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रिषभ पंतला मागील बराच काळ सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीनं आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत पंतला बाकावरच बसवून ठेवले आहे. कोहलीनं वृद्धीमान साहाला संधी दिली आणि साहानंही आपल्या कामगिरीतून कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. अशात बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतील पंतचे स्थान डळमळीत झाल्याची चर्चा आहे. या मालिकेसाठी पंतला संघात संधी मिळेल, पण त्याचवेळी आणखी एका यष्टिरक्षकाच्या नावाचा विचार सुरू आहे. या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या एका वन डे सामन्यात खणखणीत द्विशतकी खेळी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याचा बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत संघात समावेस झाल्यास, पंतला अंतिम अकरामध्ये संधी मिळणे अवघडच होईल.

संजू सॅमसन असे या यष्टिरक्षकाचे नाव आहे. मागील आठवड्यात  केरळच्या फंलदाजानं एलिट गट 'अ' मधील सामन्यात गोवा संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करताना हिटमॅन रोहित शर्माचा विक्रम मोडला. संजूनं 125 चेंडूंत द्विशतक झळकावलं. त्यानं 129 चेंडूंत 21 चौकार व 10 षटकारांसह नाबाद 212 धावा चोपल्या आणि संघाला 3 बाद 377 धावांपर्यंत मजल मारून दिली. लिस्ट A क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा संजू हा आठवा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी पाच द्विशतकं ही वन डे क्रिकेटमध्ये झळकावली आहेत, त्यातील तीन ही रोहित शर्माच्या नावावर आहेत, तर उर्वरित दोन सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहेत. 

शिखर धवनने 2013मध्ये भारत A संघाचे प्रतिनिधित्व करतान  दक्षिण आफ्रिका A संघाविरुद्ध 248 धावा केल्या आणि कर्ण वीर कौशलने विजय हजारे चषक स्पर्धेत उत्तराखंडचे प्रतिनिधित्व करताना सिक्कीमविरुद्ध 202 धावा केल्या होत्या. विजय हजारे चषक स्पर्धेतील हे पहिले द्विशतक ठरले होते. संजूसह बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत मुंबईच्या शिवम दुबेच्या नावाचाही विचार सुरू आहे. 

बांगलादेशचा संघ जाहीरशकिब अल हसन ( कर्णधार), तमीम इक्बाल, लिटन दास, सौम्या सरकार, नैम शेख, मुश्फीकर रहीम, महमुदुल्लाह, अफीफ होसैन, मोसादेक होसैन, अनिमुल इस्लाम, अराफत सन्नी, मोहम्मद सैफुद्दीन, अल-अमीन होसैन, मुस्ताफिजूर रहमान, सफीऊल इस्लाम.

मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक3 नोव्हेंबर - पहिली ट्वेंटी-20,  दिल्ली7 नोव्हेंबर- दुसरी ट्वेंटी-20, राजकोट10 नोव्हेंबर- तिसरी ट्वेंटी-20, नागपूर

14 ते 18 नोव्हेंबर - पहिली कसोटी, इंदूर22 ते 26 नोव्हेंबर - दुसरी कसोटी, कोलकाता.

टॅग्स :रिषभ पंतभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय