Join us

भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय

Sanjog Gupta ICC CEO: संजोग गुप्ता यांच्याआधी कोण होते CEO, पाहा यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 20:37 IST

Open in App

Sanjog Gupta ICC CEO: जागतिक स्तरावर भारतीय क्रिकेटचे नाव हळूहळू मोठे होत आहे. सध्या ICCच्या चेअरमन पदावर भारतीय व्यक्ती विराजमान आहे. BCCIचे माजी सचिव जय शाह यांना तो बहुमान मिळाला आहे. तशातच आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) संजोग गुप्ता यांना त्यांचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्त केले आहे. संजोग गुप्ता यांनी सोमवारी ७ जुलैपासून ही जबाबदारी स्वीकारली. संजोग यांनी ऑस्ट्रेलियाचे जेफ अ‍ॅलार्डिस यांची जागा घेतली. ते २०२१ पासून या पदावर होते. संजोग हे आयसीसीचे सातवे सीईओ आहेत आणि मनु साहनी यांच्यानंतर ही जबाबदारी स्वीकारणारे ते दुसरे भारतीय ठरले.

संजोग यांचे कार्यकर्तृत्व

संजोग गुप्ता सध्या जिओस्टारमध्ये सीईओ (क्रीडा आणि थेट प्रक्षेपण विशेष अनुभव) म्हणून काम करत आहेत. भारतातील खेळांच्या डिजिटल आणि टीव्ही प्रसारणाला नवीन दिशा देण्यात संजोग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL), आयसीसीच्या स्पर्धा, प्रो कबड्डी लीग (PKL) आणि इंडियन सुपर लीग (ISL) सारख्या मोठ्या क्रीडा स्पर्धा लोकप्रिय करण्यात संजोग गुप्ता यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

पत्रकार ते ICC चे CEO ... प्रेरणादायी प्रवास

संजोग गुप्ता यांनी पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. २०१० मध्ये ते स्टार इंडियामध्ये सामील झाले. नंतर त्यांनी डिस्ने-स्टारचे क्रीडा प्रमुख म्हणून काम पाहिले. तेथे संजोग यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा विभागाचा व्यावसायिक विस्तार झाला. त्यासोबतच, प्रेक्षकांची संख्याही वाढली. त्यांच्या याच अनुभवामुळे आता त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत जबाबदारीचे पद मिळाले.

जय शाह म्हणाले...

ICCचे अध्यक्ष जय शाह यांनी संजोग गुप्ता यांच्याबद्दल सांगितले की, संजोग यांना क्रीडा नियोजन आणि व्यापारीकरणाचा व्यापक अनुभव आहे. क्रिकेटबद्दलची त्यांची आवड आणि तंत्रज्ञानाची समज या खेळाच्या जागतिक विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावेल. ऑलिंपिकसारख्या व्यासपीठांवर क्रिकेटला नियमित स्थान मिळावे असा आमचा प्रयत्न असेल. आम्ही या पदासाठी अनेक उमेदवारांचा विचार केला होता, परंतु नामांकन समितीने एकमताने संजोग यांची शिफारस केली. आयसीसी संचालक मंडळ त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे आणि मी आयसीसीमधील सर्वांच्या वतीने त्यांचे स्वागत करू इच्छितो.'

ICCचे आतापर्यंतचे CEO

  • डेव्हिड रिचर्ड्स (ऑस्ट्रेलिया): १९९३-२००१
  • मॅल्कम स्पीड (ऑस्ट्रेलिया): २००१-२००८
  • हारून लॉर्गट (दक्षिण आफ्रिका): २००८-२०१२
  • डेव्हिड रिचर्डसन (दक्षिण आफ्रिका): २०१२-२०१९
  • मनु साहनी (भारत): २०१९-२०२१
  • ज्योफ अ‍ॅलार्डिस (ऑस्ट्रेलिया): २०२१-२५
  • संजोग गुप्ता (भारत): २०२५ पासून सुरूवात
टॅग्स :आयसीसीबीसीसीआयजय शाह