Jasprit Bumrah BCCI: भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अलिकडच्या इंग्लंड दौऱ्यात फक्त तीन कसोटी सामने खेळू शकला. बुमराहने लीड्स, लॉर्ड्स आणि मँचेस्टर कसोटी सामन्यांमध्ये भाग घेतला. एजबॅस्टन आणि ओव्हल कसोटी सामन्यांमध्ये त्याला वर्कलोड व्यवस्थापनाखाली विश्रांती देण्यात आली. आता टीम इंडियाचे मराठमोळे माजी क्रिकेटपटू, वर्ल्डकप विजेते खेळाडू आणि माजी निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील यांनी वर्कलोड धोरणावरून जसप्रीत बुमराह आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (BCCI) निशाणा साधला आहे.
फिजिओ संघ निवड ठरवणार का?
संदीप पाटील हे १९८३चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होते. संदीप पाटील म्हणाले की, मोठ्या मालिकेत मुख्य खेळाडूंना विश्रांती देणे योग्य मार्ग नाही. मला आश्चर्य वाटते की बीसीसीआय या सर्व गोष्टींना कसे सहमती देत आहे. कर्णधार किंवा मुख्य प्रशिक्षकापेक्षा फिजिओ जास्त महत्त्वाचा आहे का? मग निवडकर्त्यांबद्दल काय मत आहे? आता आपण अशी अपेक्षा केली पाहिजे का, की फिजिओ देखील निवड समितीच्या बैठकींमध्ये सहभागी होतील. ते निर्णय घेतील का?
त्याकाळी आम्ही ब्रेक मागितला नाही...
संदीप पाटील पुढे म्हणाले, 'जेव्हा तुमची तुमच्या देशासाठी निवड होते, तेव्हा तुम्ही देशासाठी खेळता. तुम्ही एक योद्धा आहात. मी सुनील गावस्कर यांना सामन्याच्या पाचही दिवस फलंदाजी करताना पाहिले आहे. मी कपिल देव यांना कसोटी सामन्याच्या बहुतेक दिवस गोलंदाजी करताना पाहिले. कपिल देव देखील नेटमध्ये खूप गोलंदाजी करायचे. त्यांनी कधीही ब्रेक मागितला नाही आणि कधीही तक्रार केली नाही. त्यांची कारकीर्द १६ वर्षांहून अधिक काळ टिकली. १९८१ मध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये डोक्याला दुखापत झाल्यानंतरही मी पुढचा कसोटी सामना खेळलो होते.
आमच्यावेळी 'ड्रामा' नव्हता...
"आमच्या काळात कोणताही रिहॅबचा कार्यक्रम नसायचा. तरीही आम्ही खेळायचो. दुखापत असेल तर सांभाळून घ्यायचो पण खेळायचो. कारण मी फक्त एवढेच म्हणेन की आम्हाला देशासाठी खेळण्यात आनंद वाटत होता, त्यावेळी आमचा कुठलाही ड्रामा नसायचा," असेही ते म्हणाले.