नवी दिल्ली : ‘यष्टिरक्षक रिषभ पंतला भारतीय संघ व्यवस्थापनाने पुरेसा वेळ दिला. मात्र पंतने विश्वास सार्र्थकी लावला नाही. त्याने स्वत:ला सिद्ध केले नाही, तर संजू सॅमसन त्याची जागा घेण्यास सज्ज आहे. त्याची निवड पंतसाठी धोक्याची घंटा आहे, असे समजण्यास हरकत नाही,’ असे मत माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने व्यक्त केले.
लक्ष्मण म्हणाला, ‘वेस्ट इंडिजविरुद्ध तीन टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी संजू सॅमसनची निवड हा पंतसाठी इशारा आहे. पंतने एकतर दमदार कामगिरी करावी किंवा मग संघाबाहेर पडण्यास तयार राहावे. संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने सॅमसनला संघात घेत एकप्रकारचा इशारा दिला. आमच्याकडे पर्याय आहेत असे त्यांना सांगायचे असावे. रिषभला बऱ्याच संधी मिळाल्या आहेत. संघ व्यवस्थापनाने पंतला विश्वासात घेत अखेरची संधी दिली असेल, असे मला वाटते.’