सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीपूर्वी यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाने फॉर्मात असल्याचे सिद्ध करताना अर्धशतक झळकावले मात्र उर्वरित फलंदाज अपयशी ठरले. भारत ‘अ’ आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यादरम्यान पहिला सराव सामना मंगळवारी अपेक्षेप्रमाणे अनिर्णीत संपला. ऑस्ट्रेलिया ‘अ’चा वेगवान गोलंदाज मार्क स्टीकेटीने ३७ धावांच्या मोबदल्यात पाच बळी घेतले.
पहिल्या डावात खाते उघडण्यात अपयशी ठरलेल्या साहाने भारत ‘अ’ संघातर्फे दुसऱ्या डावात सर्वाधिक ५४ धावा केल्या. त्यासाठी त्याला १०० चेंडू खेळावे लागले. त्याने आपल्या खेळीत सात चौकार लगावले.
पहिल्या डावात ५९ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर भारताने दुसरा डाव ९ बाद १८९ धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाला विजयासाठी १५ षटकांत १३० धावांची गरज होती, पण तिसऱ्या व अखेरच्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी त्यांनी १ बाद ५२ धावा केल्या होत्या.
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत पहिल्या कसोटीनंतर भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळणार असलेल्या उपकर्णधार अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात शतक झळकावल्यानंतर दुसऱ्या डावात २८ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
भारत ‘अ’ पहिला डाव ९ बाद २४७ (घोषित). ऑस्ट्रेलिया ‘अ’ पहिला डाव ९ बाद ३०६ (घोषित).भारत ‘अ’ दुसरा डाव ६१ षटकांत ९ बाद १८९ (रिद्धिमान साहा नाबाद ५४, शुभमन गिल २९, अजिंक्य रहाणे २८, पृथ्वी शॉ १९, उमेश यादव ११ : स्टीकेटी ५-३७,ग्रीन २-१२ निसार २-४१). ऑस्ट्रेलिया ‘अ’ दुसरा डाव १५ षटकांत १ बाद ५२ (विल पुकोवस्की रिटायर्ड हर्ट २३, मार्क हॅरिस नाबाद २५ : उमेश यादव १-१४)
कार्तिक त्यागीच्या बाऊंसरने विल पुकोवस्की जखमी
सिडनी : भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याच्या उंबरठ्यावर उभा असलेला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज विल पुकोवस्कीच्या हेल्मेटवर भारत ‘अ’विरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान कार्तिक त्यागीचा बाऊंसर आदळला. त्यामुळे ११ डिसेंबरपासून प्रारंभ होणाऱ्या दुसऱ्या सराव सामन्यात तो खेळू शकणार नाही.
पुकोवस्की १७ डिसेंबरपासून प्रारंभ होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार असल्याचे मानल्या जात आहे. कारण डेव्हिड वॉर्नर दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. पुकोवस्की २३ धावांवर खेळत असताना दुसऱ्या डावातील १३ व्या षटकांत त्यागीचा बाऊंसर त्याच्या हेल्मेटवर आदळला.