मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर प्रवास करत असलेल्या एका छोटेखानी विमानाची केनियाचा जंगलातील एका सपाट जागेवर (मातीच्या रस्त्याचा छोटा विमानतळ) आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. केनियाच्या मासाई मारा जंगलात ही जागा आहे. एका मोठ्या वादळामुळे त्याचे विमान पुढे जाऊ शकत नव्हते. यामुळे या विमानाला घनदाट जंगलातील या जागेवर उतरावे लागले होते. सचिनने याची माहिती दिली आहे.
तेंडुलकरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, यात तो ते छोटेखानी विमान दाखवत आहे. मातीच्या रस्त्यावर हे विमान उतरविण्यात आले होते. वादळी वारा आणि पाऊस असल्याने हे विमान पुढे उड्डाण करू शकत नाही. यामुळे त्याला नेण्यासाठी जीप येत असल्याचे तो म्हणाला आहे. परंतू, जर या जीप नाही आल्या तर रात्री या जंगलात थांबावे लागणार असल्याचे त्याने सांगितले. तसेच हा ही एक अनुभव एन्जॉय करण्याचा आहे, असे तो म्हणाला.
मसाई मारावरून उड्डाण करत असताना त्याला दुरून एक भयानक वादळ दिसले. खराब हवामानामुळे पायलटला दोनदा लँडिंग रद्द करावे लागले, ज्यामुळे विमानात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. रनवे मोकळा झाल्यानंतर विमान दुसऱ्या बाजूला लँड करण्यात आल्याचे सचिनने म्हटले आहे.