दिग्गज सचिन तेंडुलकरने नुकतीच आयुष्याची पन्नास वर्षे पूर्ण केली. सचिन म्हणजे भारतीय क्रिकेटमधील दंतकथा! तो फलंदाजी करायचा तेव्हा वेळदेखील थांबत असे, असे म्हटले जाते. सचिनच्या सन्मानार्थ या खेळातील दिग्गजांनी काय म्हटले ते जाणून घेऊया...
जगात दोन प्रकारचे फलंदाज आहेत. एक सचिन आणि दुसरे अन्य सर्वजण.
- ॲण्डी फ्लॉवर, झिम्बाब्वेचा माजी कर्णधार.
सचिनने उत्कृष्ट फटकेबाजी करण्याचा अर्थ भारतीयांना सुखाची झोप लागणे
- हर्षा भोगले, समालोचक.
‘वन डे’त मी दहा हजार धावा केल्या होत्या, हे माझे नातवंडं विसरू शकतील; पण सचिनसोबत खेळत होतो, हे ते नक्की स्मरणात ठेवतील.
- राहुल द्रविड, टीम इंडियाचे मुख्य कोच.
मी देवाला पाहिले, जो भारतासाठी कसोटीत चौथ्या स्थानावर फलंदाजी करायचा.
- मॅथ्यू हेडन, ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर.
आम्ही भारताविरुद्ध हरत नाही, आम्ही सचिन तेंडुलकरविरुद्ध हरतो.
- मार्क टेलर, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार.
सचिन फलंदाजी करतो तेव्हा स्वत:चे सर्व गुन्हे कबूल करा. कारण परमेश्वरदेखील त्यावेळी सचिनची फलंदाजी पाहण्यात तल्लीन होत असतो.
- एक ट्विट
ट्रेन शिमल्याहून दिल्लीला जात होती. एका स्टेशनवर नेहमीप्रमाणे थांबली. सचिन त्यावेळी ९८ धावांवर खेळत होता. प्रवासी, रेल्वेचे अधिकारी आणि अन्य सर्वच सचिनच्या शतकाच्या प्रतीक्षेत होते. ट्रेन शतक पूर्ण होईपर्यंत थांबली. हा महान खेळाडू भारतात वेळेला देखील रोखून धरत होता.
- पीटर रिबॉक, माजी इंग्लिश क्रिकेटपटू.
सचिन स्वत:च्या खांद्यावर २१ वर्षे देशवासीयांच्या अपेक्षांचे ओझे वाहत होता.
- विराट कोहली, स्टार क्रिकेटपटू.
मी गॅरी कर्स्टन यांना नेहमी विचारायचो की सचिन फलंदाजी करताना तुम्ही कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण करता की टाळ्या वाजविण्यासाठी उभे असता.
- हॅन्सी क्रोनिए, द. आफ्रिकेचा माजी कर्णधार.