मुंबई- क्रिकेटचा देव अशी बिरुदावली मिरवणाऱ्या सचिन तेंडुलकरला घडवणाऱ्या गुरू रमाकांत आचरेकर सरांचं निधन झालं आहे. सचिन तेंडुलकरला घडवण्यात आचरेकरांचा मोलाचा वाटा आहे. सचिनने आचरेकर सरांनी त्याला कसे घडविले हे सांगितले होते. आचरेकर सरांच्या 79 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं सचिननं आचरेकरांप्रति असलेल्या भावना व्यक्त केल्या होत्या. सरांच्या 100 शिष्यांनी हा वाढदिवस साजरा केला होता. हा सोहळा वांद्रे-कुर्ला संकुलात रंगला होता.
सचिनसह अनेक क्रिकेटपटूंनी आठवणींना उजाळा दिला. आचरेकरसरांनी सचिनला कसे घडविले याचे अनेक किस्से प्रसिद्ध झाले आहेत. काही किस्से प्रथमच चाहत्यांसमोर आले. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सचिननं हा भावुक संदेश लिहून स्वतःच्या भावनांना वाटही मोकळी करून दिली होती. क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरनं त्यावेळी ट्विट करत लहानपणीचे गुरू रमाकांत आचरेकर सरांप्रति सन्मान व्यक्त केला होता. त्या ट्विटमध्ये सचिननं एक फोटोही शेअर केला होता. ज्यात तो गुरू रमाकांत आचरेकर सरांच्या पाया पडताना दिसत आहे.
त्यादरम्यान सचिनबरोबर त्याचे मित्र अतुल रानडेही उपस्थित होते. त्या ट्विटमध्ये सचिननं लिहिलं होतं की, आज गुरुपौर्णिमा आहे. ज्या दिवशी आम्ही त्यांची आठवण काढतो. ज्यांनी आम्हाला चांगला माणूस केलं. आचरेकर सर मी तुमच्याशिवाय हे करू शकत नव्हतो. तुमच्या गुरुप्रति आदर व्यक्त करण्यास विसरू नका, त्यांचं आशीर्वाद घेत राहा. अतुल रानडे आणि मीसुद्धा त्यांचा आशीर्वाद घेतला आहे. सचिनच्या त्या भावुक ट्विट पुन्हा एकदा स्मरणात आलं आहे.