Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तेंडुलकरला दोन गुण हवेत, मला वर्ल्ड कप हवाय', भारत-पाक सामन्यावर 'दादा'चा षटकार

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी वर्ल्ड कपमध्ये खेळू नये अशी भावना व्यक्त केली जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 14:33 IST

Open in App

मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी वर्ल्ड कपमध्ये खेळू नये अशी भावना व्यक्त केली जात आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात टाकला आहे. मात्र, महान फलंदाज सचिन तेंडुलकरने, भारतीय संघाने वर्ल्ड कपमध्ये सामना खेळून पाकिस्तानला पराभूत करावे. उगाच त्यांना दोन गुण देऊ नये, असे मत व्यक्त केले होते. तेंडुलकरच्या या विधानावर माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही प्रतिक्रीया दिली आहे. 

सचिन म्हणाला होता की, " भारताने नेहमीच पाकिस्तानविरुद्ध चांगलीच कामगिरी केली आहे. आता पुन्हा एकदा त्यांना मैदानात पराभूत करायला हवे. जर पाकिस्तानबरोबर आपण खेळलो नाही तर आपल्याकडून त्यांना दोन गुण बहाल होतील. त्यामुळे मला तरी असे वाटते की आपण पाकिस्तानला दोन गुण देऊ नये. पण माझ्यासाठी देश जो निर्णय घेईल तोच योग्य असेल." या विधानावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. पण, तेंडुलकरच्या या विधानावर गांगुली म्हणाला,'' तेंडुलकरला दोन गुण हवे आहेत, पण मला वर्ल्ड कप हवा आहे. याकडे तुम्हाला हव्या त्या नजरेनं पाहा.'' 

भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्या विधानावर सहमती दर्शवताना तेंडुलकरने भारताने वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळावे असे मत व्यक्त केले. मात्र, त्याचवेळी गांगुलीने सहकारी हरभजन सिंहच्या विधानाला पाठिंबा देताना पाकिस्तानसोबत केवळ क्रिकेटच नव्हे, तर अन्य खेळांतील संबंधही तोडून टाका, असे मत व्यक्त केले होते. तो म्हणाला,'' वर्ल्ड कप स्पर्धेत दहा संघ सहभागी होणार आहेत आणि प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध खेळेल. पण, भारताने पाकिस्तानविरुद्धचा एक सामना खेळला नाही, तर फार फरक पडणार नाही. भारतीय संघाशिवाय वर्ल्ड कप घेणं आयसीसीला सोपं जाणार नाही. पण, पाकिस्तानमध्ये कठोर संदेश जाणं गरजेचं आहे.'' 

गांगुली पुढे म्हणाला,''भारताला पाकिस्तानशी सर्व संबंध तोडायला हवेत. देशवासीयांमधून ज्या प्रतिक्रिया येत आहेत, त्या रास्त आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर द्विदेशीय मालिका होण्याची शक्यता मावळली आहेच. केवळ क्रिकेटच नव्हे तर हॉकी, फुटबॉल आदी सर्व खेळांमधले संबंध तोडायला हवेत.''  

पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनी गांगुलीच्या या विधानावर टीका केली. गांगुलीला निवडणुकीचे वेध लागले आहेत आणि त्याला मुख्यमंत्री बनायचे आहे. म्हणून तो असे विधान करतोय, अशी टीका मियाँदाद यांनी केली होती. 

टॅग्स :सौरभ गांगुलीसचिन तेंडुलकरपुलवामा दहशतवादी हल्लाबीसीसीआयहरभजन सिंग