Sports Fraternity Reaction, Pahalgam Terror Attack: दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारे भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि पी. व्ही. सिंधू तसेच माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह भारतीय क्रीडा क्षेत्राने पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर दुःख व्यक्त करताना या हल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला.
काश्मीरमधील पहलगाम येथील एका प्रमुख पर्यटन स्थळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश स्तब्ध झाला. विविध क्षेत्रातून या दहशतवादी हल्ल्याचा निषेध होत असताना शुभमन गिल, लोकेश राहुल, रवी शास्त्री, पार्थिव पटेल या क्रिकेटपटूंसह अनेक खेळाडूंनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
पीडित कुटुंबे एका अकल्पनीय संकटातून जात असतील. या दुःखाच्या वेळी भारत आणि जग त्यांच्यासोबत आहे. आम्ही मृतांबद्दल शोक व्यक्त करतो आणि न्यायासाठी प्रार्थना करतो.-सचिन तेंडुलकर, माजी क्रिकेटपटू
जम्मू-काश्मीरमधील हल्ल्याने मन दुखावले आहे. पीडितांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रार्थना करतो.-नीरज चोप्रा, भालाफेकपटू
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे खूप वेदना, खूप नुकसान झाले. पीडित कुटुंबांचे कुख शब्दांच्या पलीकडे आहे. परंतु तुम्ही एकटे नाही आहात. आम्ही तुमच्यासोबत आहोत.-पी.व्ही. सिंधू, बॅडमिंटनपटू
पीडितांच्या कुटुंबीयांना मनापासून सहवेदना ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबीयांना शांती आणि शक्ती मिळो आणि त्यांना न्याय मिळो अशी मी प्रार्थना करतो.-विराट कोहली, क्रिकेटपटू
धर्माच्या नावाखाली निष्पाप नागरिकांना लक्ष्य करणे आणि त्यांची हत्या करणे हे अत्यंत वाईट आहे. हा कसला लढा आहे, जेथे मानवी जीवनाला काहीच किंमत नाही? मला आशा आहे की, हा वेडेपणा लवकरच संपेल आणि या दहशतवाद्यांना शिक्षा होईल.-मोहम्मद सिराज, क्रिकेटपटू
आगामी काळात आपले शूर सैनिक या भ्याड हल्ल्याला निश्चितच योग्य उत्तर देतील. भारतमातेच्या शूर सुपुत्रांच्या उपस्थितीत जम्मू आणि काश्मीरमधील शांतता भंग करू इच्छिणाऱ्यांचे हेतू कधी ही यशस्वी होणार नाहीत.-विजेंदर सिंग, माजी बॉक्सर
पहलगाममधील दहशतवादी हल्ता हृदयद्रावक आहे. पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या सहवेदना आहेत. आपल्या जगात दहशतवादाला स्थान नाही, आपण द्वेष आणि हिंसाचाराच्या विरोधात एकत्र आले पाहिजे.-अभिनव बिंद्रा, माजी नेमबाज