Join us

सचिन तेंडुलकरला 'बाईपण भारी देवा'ची भुरळ; म्हणाला, "मी माझ्या आई आणि...",

'बाईपण भारी देवा' या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून अनेकांना भुरळ घातली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 18:45 IST

Open in App

मुंबई : 'बाईपण भारी देवा' या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून अनेकांना भुरळ घातली आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या चित्रपटांना टक्कर देत या मराठी चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरुच आहे. ३० दिवसांत 'बाईपण भारी देवा' चित्रपटाने ७० कोटींची विक्रमी कमाई केली आहे. या चित्रपटाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून दिग्दर्शक केदार शिंदेही भारावून गेल्याचे पाहायला मिळाले. अशातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देखील या चित्रपटाने आपलंस केलं आहे. सचिनने या चित्रपटाच्या टीमची भेट घेऊन आपला आनंद व्यक्त केला. 

सचिनने 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट ही एक हृदयस्पर्शी कथा असल्याचे म्हटले. त्याने चित्रपटाच्या टीमची भेट घेऊन आपला अनुभव सांगताना म्हटले, "'बाईपण भारी देवा' ही ६ बहिणींची हृदयस्पर्शी कथा आहे. हा मराठी चित्रपट पाहून मला खूप आनंद झाला आणि मी माझ्या आई आणि मावशीला सुद्धा हा चित्रपट पाहण्यासाठी आग्रह करणार आहे. शिवाय, कलाकारांना भेटणे हा एक सुंदर अनुभव होता."

'बाईपण भारी देवा' हा चित्रपट ३० जूनला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून दाखवलेल्या सहा बहिणींच्या अनोख्या गोष्टीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. विशेषत: महिला वर्गाच्या हा चित्रपट जास्त पसंतीस उतरल्याचं चित्र आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टांगडी, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, दीपा परब, वंदना गुप्ते आणि सुचित्रा बांदेकर या अभिनेत्रींनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. 

टॅग्स :सचिन तेंडुलकरमराठी चित्रपटकेदार शिंदे
Open in App