भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर पुन्हा एका क्रिकेटच्या मैदानावर बॅट घेऊन उतरणार आहे. यावेळी तेंडुलकरसह माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागही भारताच्या संघासाठी सलामीला येणार आहे. पण, ही जोडी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नव्हे तर एका सामाजिक कारणासाठी पुन्हा ओपनिंग करणार आहे. त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेचे दिग्गजही असणार आहे.
भारतात दरवर्षी रस्ता अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संघ्या जगभरातील आकडेवारीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि वाहतुकीचे नियम समजावून सांगण्यासाठी तेंडुलकरनं पुढाकार घेतला आहे. या जनजागृतीसाठी पुढील वर्षी 4 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत Road Safety World Series ट्वेंटी-20 लीगचे आयोजन करण्यात आले आहे. या लीगमध्ये पाच संघांचा समावेश असून जगभरातील 75 दिग्गज त्यात खेळणार आहेत. तेंडुलकर व सेहवाग यांच्याव्यतिरिक्त ब्रेट ली, ब्रायन लारा, तिलकरत्ने दिलशान, जाँटी ऱ्होड्स यांचाही समावेश आहे. तेंडुलकरकडे भारताच्या संघाचे नेतृत्व आहे, तर ब्रेट ली, लारा, दिलशान व जाँटी आपापल्या देशाच्या नावानं सहभागी असलेल्या संघाचे नेतृत्व सांभाळणार आहेत.
तेंडुलकर या लीगचा ब्रँड अॅम्बेसिडर आहे. तो म्हणाला,''मी या लीगमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहे. या लीगच्या माध्यमातून मला सर्वांना एक संदेश द्यायचा आहे. भारतात वाहतुक नियमांचे पालन होत नाही. बाईकस्वार हेल्मेट घालत नाहीत. शिस्तीचं पालन झालं, तर अपघात होणार नाही. लोकांमधील संयम संपत चाललेला आहे, प्रत्येकाला कसलीतरी घाई लागलेली आहे. वाहन चालकांना मी विनंती करू इच्छितो. एखादा वृद्ध रस्ता ओलांडत असेल, तर तो रस्ता ओलांडेपर्यंत गाडी थांबवा. थोडा उशीर झाला तर काही बिघडत नाही. अस करून तुम्ही त्या वृद्ध व्यक्तीचा आशीर्वाद मिळवाल.''
कशी असेल ही लीग
पाच संघ ( भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज)
पहिले सत्र मुंबई आणि पुणे येथे खेळवण्यात येईल.
प्रत्येक संघ एकमेकांशी खेळेल आणि सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या दोन संघांत जेतेपदाचा सामना होईल