SA20 ( Marathi News ) - दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगचा पहिला सामना पावसामुळे वाहून गेल्यानंतर, गुरुवारी रात्री दुसरा सामना किरॉन पोलार्डच्या MI Cape Town आणि Durban's Super Giants यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पोलार्डच्या संघाने प्रथम फलंदाजी करून ५ बाद २०७ धावा केल्या होत्या. पण, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सुपर जायंट्सने ११ धावांनी हा सामना जिंकला. सुपर जायंट्ससाठी हेनरिच क्लासेनने केवळ ३५ चेंडूंत ४ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ८५ धावांची खेळी केली.
डर्बन सुपर जायंट्सचे मालकी हक्क हे आयपीएल फ्रँचाइजी लखनौ सुपर जायंट्सचे आहेत आणि दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगमधील सर्व ६ संघ भारतीय फ्रँचायझींचे आहेत. रायन रिकेल्टन आणि रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( २४) यांनी एमआय केप टाऊनला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी ८२ धावा जोडल्या. रिकेल्टनने ८७ धावांची खेळी खेळली. शेवटी किरॉन पोलार्डने अवघ्या १४ चेंडूत नाबाद ३१ धावांची तुफानी खेळी केली. पोलार्डने ४ चौकार आणि १ षटकार लगावला. एमआय केपटाऊनने ५ गडी गमावून २०७ धावा केल्या.
डर्बन सुपर जायंट्सने डकवर्थ लुईस नियमानुसार सामना जिंकला. २०८ धावांचा पाठलाग करताना सुपर जायंट्सने १६.३ षटकांत १७७ धावा केल्या होत्या. पाऊस सुरू झाला आणि खेळ थांबवावा लागला. यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार सुपर जायंट्स संघ ११ धावांनी पुढे असल्याचे दिसून आले. अशा स्थितीत सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही आणि सुपर जायंट्सना ११ धावांची विजयी घोषित केले गेले. क्लासेनने ३५ चेंडूंत ४ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ८५ धावांची तुफानी खेळी केली. मॅथ्यू ब्रिट्झकेने २४ चेंडूत ३९ धावा केल्या.