Join us

Babar Aazam ला खुणावतोय वर्ल्ड रेकॉर्ड; रोहितसह किंग कोहलीचाही मोठा विक्रम धोक्यात

बाबर आझमला एका डावात दोघांना मागे टाकण्याची संधी, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 19:42 IST

Open in App

 पाकिस्तानचा संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. डरबनच्या मैदानात रंगणाऱ्या टी-२० सामन्यासह पाकिस्तानचा संघ या दौऱ्याची सुरुवात करेल. ३ सामन्यांच्या या मालिकेत पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि स्टार बॅटर बाबर आझमला वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याची संधी आहे. गेल्या काही दिवसांपासून बाबर आझम लौकिकाला साजेसा खेळ करण्यात सातत्याने अपयशी ठरताना दिसतोय. संघर्षाचा सामना करत असताना त्याला वर्ल्ड रेकॉर्ड सेट करण्याची संधी चालून आली आहे. 

बाबर आझमच्या निशाण्यावर आहे हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या टी-२० मालिकेत ४० धावा करताच तो टी-२० चा बादशाह होईल. सध्याच्या घडीला छोट्या फॉर्मेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड हा रोहित शर्माच्या नावे आहे. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रोहित शर्मानं टी-२० क्रिकेटमधून निवृती घेतलीये. रोहित शर्मानं आपल्या आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत १५९ सामन्यातील १५१ डावात ४३१ धावा केल्या आहेत. यात त्याने ५ शतके आणि ३२ अर्धशतके झळकावली आहेत. या यादीत बाबर आझम दुसऱ्या स्थानावर आहे. १२६ सामन्यातील ११९ डावात बाबर आजमनं आपल्या खात्यात ४१९२ धावा जमा केल्या आहेत.  यात त्याच्या भात्यातून ३ शतके आणि ३६ अर्धशतके पाहायला मिळाली आहेत.

कोहलीला मागे टाकण्याचा डाव साधण्याचीही संधी, पण..

रोहित शर्माशिवाय पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम याला विराट कोहलीचा एक खास विक्रमही मागे टाकण्याची संधी आहे. विराट आणि बाबर दोघांनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३९ वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. रोहित पाठोपाठ विराट कोहलीनंही आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये निवृत्ती घेतलीये. त्यानं आपल्या आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत  १ शतक आणि ३८ अर्धशतकांसह ४१८८ धावा केल्या आहेत. टी२०I मध्ये सर्वाधिक धावांच्या बाबतीत विराटला ओव्हरटेक केल्यावर आता सर्वाधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम करण्यात बाबर यशस्वी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल. बाबर चांगली सुरुवात मिळूनही अर्धशतक साजरे करण्यात अपयशी ठरताना दिसला आहे. त्यामुळे रोहित-विराट यांना मागे टाकण्याचा डाव साधणं त्याच्यासाठी सोपी गोष्ट नसेल. 

टॅग्स :बाबर आजमपाकिस्तानद. आफ्रिकारोहित शर्माविराट कोहली