पाकिस्तान संघानं दुसऱ्या वनडे सामन्यातील विजयासह दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ३ सामन्यांची वनडे मालिका २-० अशी खिशात घातलीये. पाकिस्तानच्या खेळाडूंनी बॅटिंग बॉलिंगमध्ये दबदबा दाखवून देत टी-२० मालिकेतील पराभवाचा वचपा काढला. पण वनडे मालिकेतील पाकिस्तान संघाच्या विजयापेक्षाही चर्चा रंगतीये ती मैदानात रंगलेल्या वादाची.
भर मैदानात रिझवान-क्लासेन एकमेकांना भिडले
केपटाउनच्या मैदानात रंगलेल्या वनडे सामन्यात पाक कॅप्टन मोहम्मद रिझवानसह हॅरिस राउफ ही मंडळी दक्षिण आफ्रिकेचा स्टार बॅटर हॅन्रिक क्लासेन याला भिडल्याचा सीन पाहायला मिळाला. भर मैदानात रंगलेला हा ड्रामा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हेन्रिक क्लासेन पाकिस्तानी गोलंदाजांचा क्लास घेत असताना हा सर्व प्रकार घडला.
बाबरसह पंचांनी मिटवला वाद
दक्षिण आफ्रिकेच्या डावातील २६ व्या षटकातील अखेरचा चेंडू टाकल्यावर हॅरिस राउफ हा क्लासेनला काहीतरी बोलला. दोघांच्यात स्लेजिंगचा खेळ रंगला असताना त्यात विकेटमागे उभ्या असलेल्या पाक कॅप्टन मोहम्मद रिझवानची एन्ट्री झाली. बाबर आझम आणि मैदानातील पंचांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला.
बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही दिसला पाकचा जलवा
टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना पाकिस्तानच्या संघानं ४९.५ षटकात ३२९ धावा केल्या होत्या. यात पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान याने ७३ चेंडूत ८० धावांची दमदार खेळी केली. त्याच्याशिवाय बाबर आझमनंही अर्धशतक झळकावले. कामरान गुलाब याने सहव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ३२ चेंडूत ६३ धावा कुटल्या. बॅटिंगमधील क्लास शोनंतर पाक गोलंदाजांनी आपली जबाबदारी अगदी चोख पार पाडली. शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह या जोडीनं ७ विकेट्स घेतल्या. परिणामी दक्षिण आफ्रिकेचा डाव ४३.१ षटकात २४८ धावांत आटोपला. पाकिस्तानच्या संघाने ८१ धावांसह सामन्यासह मालिका आपल्या नावे केली. याआधी ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत पाकिस्तानला यजमान दक्षिण आफ्रिकेच्या संघानं २-० अशी मात दिली होती.