SA vs PAK 2nd Test Fight Moment Between Babar Azam And Wiaan Mulder : पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम हा फिल्डवर नेहमी कूल अंदाजात वावरतो. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाउन कसोटी सामन्यात असं काही घडलं की, तो स्वत:वरील नियंत्रण गमावून थेट भांडणाच्या मूडमध्ये दिसला. मैदानातील वाद अन् बाबर आझमचा राग दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. केपटाउनच्या मैदानात दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळात बाबर आझम दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाला नडल्याचे पाहायला मिळाले. जाणून घेऊयात फिल्डवर नेमकं काय घडलं? यासंदर्भातील सविस्तर स्टोरी
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राग अनावर होण्यासारखं बाबरसंदर्भात काय घडलं?
केपटाउन कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पाकिस्तानला फॉलोऑन दिला. ही नामुष्की ओढावल्यावर पाकिस्तानच्या संघानं पराभव टाळण्याचे मोठे आव्हान घेऊन दुसऱ्या डावाला सुरुवात केली. तिसऱ्या दिवसाच्या खेळातील पाकिस्तानच्या डावातील ३२ व्या षटकात दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज वियान मुल्डर गोलंदाजी करत होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर बाबरनं थेट त्याच्या हातात चेंडू मारला. बाबरला खुन्नस देण्यासाठी गोलंदाजाने चेंडू पकडत पुन्हा तो बाबरच्या दिशेनं मारला. बाबर स्टंप सोडून बाजूला होता. पण गोलंदाजाने अगदी नेम धरून त्याच्या दिशेनं चेंडू मारल्याचे पाहायला मिळते. चेंडू लागल्यावर बाबर चांगलाच चिडला.
आधी चेंडू फेकून मारला, मग स्लेजिंगचा खेळ रंगला
फॉलोऑनची नामुष्की ओढावल्यावर दुसऱ्या डावात शान मसूद आणि बाबर आझम ही जोडी जमली. ही जोडी सेट झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचे खांदे पडले. याच दबावातून मुल्डरनं बाबरला खुन्नस देण्याचा काहीसा प्रकार केल्याचे पाहायला मिळाले. बाबर आझमच्या दिशेनं थ्रो मारल्यावर आपली चूक कबूल करून सॉरी म्हणण्याऐवजी मुल्डरनं स्लेजिंगचा खेळ सुरु केला. त्यामुळे बाबर आझम जरा अधिक तापला. दोघांच्यात फिल्डवर रंगलेला वाद मिटवण्यासाठी पंच आणि मार्करमला मध्यस्थी करावी लागली.
फॉलोऑन नंतर पाकिस्तानची तगडी बॅटिंग
दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदा बॅटिंग करताना ६१५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा पहिला डाव १९४ धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेनं पाहुण्या संघाला फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात दमदार बॅटिंग करताना पाकिस्ताननं तिसऱ्या दिवसाअखेर १ विकेटच्या मोबदल्यात २१३ धावा केल्या होत्या. बाबर आझम १२४ चेंडूत ८१ धावांची खेळी करून बाद झाला. दुसऱ्या बाजूला सलामीवीर शान मसूद १०२ धावांवर नाबाद आहे.