South Africa vs Australia : दक्षिण आफ्रिकेच्या संघाने शुक्रवारी वन डे क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्रेझी खेळी केली, असं म्हणायला हरकत नाही. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वन डे सामन्यांच्या मालिकेत धावांचा पाऊस पडताना पाहायला मिळतोय, परंतु आजच्या चौथ्या वन डे सामन्यात चौकार-षटकारांचा पूर आला, असं म्हणायला हवं. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा आत्मघातकी निर्णय घेतला अन् त्यावर हेनरिच क्लासेन ( HEINRICH KLAASEN) व डेव्हिड मिरल ( David Miller) यांच्याकडून वादळी खेळ झाला. अॅडम झम्पाच्या १० षटकांत तर ११३ धावा चोपल्या गेल्या आणि वन डे क्रिकेटमधील ही सर्वात लाजीरवाणी कामगिरी ठरली.

क्विंटन डी कॉक ( ४५), रिझा हेड्रींक्स ( २८) आणि रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( ६२) यांनी आफ्रिकेला दमदार सुरुवात करून दिली. कर्णधार एडन मार्करामला ( ८) आज अपयश आले. पण, क्लासेन व मिलर यांनी चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. क्लासेनने ५७ चेंडूंत शतक पूर्ण करून विराट कोहलीचा विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटने २०१३ मध्ये ६१ चेंडूंत शतक झळकावले होते. पण, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात कमी चेंडूत शतकाचा विक्रम विराटच्याच ( ५२ चेंडू वि. ऑस्ट्रेलिया, २०१३) नावावर आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या ३२ षटकांत ३ बाद १५७ धावा केल्या होत्या.

क्लासेन आणि मिलर यांनी पुढील १८ षटकांत संघाला २ बाद २५९ धावांचा डोंगर उभारून दिला. आफ्रिकेने ५ बाद ४१६ धावा कुटल्या. क्लासेनने ८३ चेंडूंत १३ चौकार व १३ षटकारांसह १७४ धावा केल्या, तर मिलर ४५ चेंडूंत ६ चौकार व ५ षटकारांसह ८२ धावांवर नाबाद राहिला. या दोघांनी 94 चेंडूंत 223 धावांची भागीदारी केली.