Join us

रायन रिकल्टनचं शतक, रबाडाचा भेदक मारा; दक्षिण आफ्रिकेने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा

Ryan Rickelton, SA vs AFG Champions Trophy 2025: अफगाणिस्तानला १०७ धावांनी दारूण पराभव स्वीकारावा लागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 22:31 IST

Open in App

Ryan Rickelton, SA vs AFG Champions Trophy 2025: न्यूझीलंड आणि भारत यांच्या पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेच्या संघानेही चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजयी सलामी दिली. आज पहिल्या सामन्यात त्यांनी अफगाणिस्तानचा 107 धावांनी दारुण पराभव केला. रायन रिकल्टनचे शतक आणि कबिसो रबाडाच्या भेदक माऱ्यापुढे अफगाणिस्तान फार काही करू शकले नाही. आफ्रिकेने एक शतक आणि तीन अर्धशतकांच्या जोरावर सहा बाद 315 धावा केल्या होत्या. या आव्हानाला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तानच्या संघाकडून रहमत शाह याने एकाकी 90 धावांची झुंजार खेळी केली. पण त्याला इतरांची साथ न मिळू शकल्याने अफगाणिस्तानचा डाव अवघ्या 208 धावांवर आटोपला आणि त्यांना 107 धावांनी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. आफ्रिकेकडून रबाडाने भेदक मारा करत सर्वाधिक तीन बळी घेतले.

दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत असताना चांगली सुरुवात केली होती. पण टोनी 11 धावांवर बाद झाला. त्यानंतर रायन रिकल्टनने एक बाजू लावून धरत दमदार शतक ठोकले. त्याने 106 चेंडूत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 103 धावांची खेळी केली. कर्णधार टेंबा बवुमा याने 58 धावा, रासी व्हॅन डर दूसेन याने 52 धावा तर एडन मार्करम याने नाबाद 52 धावांची खेळी करून संघाला 315 धावांपर्यंत मजल मारून दिली. अनुभवी डेव्हिड मिलर फारशी कमाल करू शकला नाही. त्याला 14 धावांवर माघारी परतावे लागले. मार्को यानसेन देखील शून्यावर बाद झाला. तर वियान मूल्डर याने नाबाद 12 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबी याने सर्वाधिक दोन तर फजलहक फारुकी, अजमतउल्ला झझाई व नूर अहमद यांनी प्रत्येकी एक-एक बळी टिपला.

316 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा डाव गडबडला. सलामीवीर रहमानुल्ला गुरबाज 10 धावांवर तर इब्राहिम झादरान 17 धावांवर माघारी परतला. सादिक उल्ला अतल हा देखील 16 धावा करून बाद झाला. पाठोपाठ हसमत उल्ला शाहिदी शून्यावर, अजमत उल्ला ओमरजाई 18 धावांवर, मोहम्मद नबी आठ धावांवर, गुलबदिन 13 धावांवर, राशीद खान 18 धावांवर तर नूर अहमद नऊ धावांवर बाद झाला. रहमत शाह याने एकाकी झुंज देत 92 चेंडूत नऊ चौकार आणि एका षटकाराच्या साथीने 90 धावांची झुंजार खेळी केली. पण दुसऱ्या बाजूनी त्याला साथ मिळू शकली नाही. आफ्रिकेने अफगाणिस्तानचा धुवा उडवला. आफ्रिकेकडून रबाडाने सर्वाधिक तीन लुंगी एनगिडीने विहान मूल्डर यांनी दोन-दोन तर मार्को यानसेन आणि केशव महाराज यांनी एक-एक बळी घेतला.

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५द. आफ्रिकाअफगाणिस्तान