Join us  

विराटच्या नेतृत्वात मी खेळलो असतो तर संघाने ३ विश्वकप जिंकले असते - एस श्रीसंत

भारतीय संघाचा माजी गोलंदाज एस. श्रीसंत त्याच्या आक्रमक स्वभावामुळे आणि झेल घेण्याच्या अप्रतिम शैलीमुळे प्रसिद्ध आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 1:28 PM

Open in App

नवी दिल्ली: भारतीय संघाचा माजी गोलंदाज एस. श्रीसंत त्याच्या आक्रमक स्वभावामुळे आणि झेल घेण्याच्या अप्रतिम शैलीमुळे प्रसिद्ध आहे. श्रीसंतने भारतीय संघाला २००७ मध्ये टी-२० विश्वकप जिंकवून देण्यात मोलाची भूमिका निभावली होती. मागील बराच काळ वादामुळे श्रीसंत क्रिकेटच्या जगापासून दूर राहिला होता. २०११ नंतर भारताने एकदाही विश्वकप जिंकला नाही, याबाबत भाष्य करताना त्याने विराट कोहलीची प्रशंसा केली. तसेच कोहली आगामी काळात काहीतरी नवीन करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. 

एस. श्रीसंतने आपल्या क्षमतेवर भाष्य करताना म्हटले की, जर विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या काळात मी संघाचा हिस्सा असतो तर भारताने २०१५, २०१९ आणि २०२१ मध्ये विश्वकप जिंकला असता. तसेच मी ज्यांना मार्गदर्शन केले आहे ते सर्व खेळाडू चांगले प्रदर्शन करत आहेत, यामध्ये संजू सॅमसन आणि सचिन बेबी यांसह काही खेळाडूंचा समावेश आहे. जेव्हा भारतीय संघाने २०११ साली विश्वकप जिंकला होता तेव्हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर खूप भावूक झाला होता. आम्ही सचिनसाठीच विश्वकप जिंकला होता, असे श्रीसंतने म्हटले. 

यॉर्कर किंग म्हणून प्रसिद्ध

आपल्या संपूर्ण क्रिकेटच्या कारकिर्दीत यॉर्कर किंग म्हणून प्रसिद्धी मिळवणाऱ्या श्रीसंतने त्याच्या जीवनप्रवासाबद्दल देखील भाष्य केले. एका छोट्याश्या गावातील मुलाने एवढ्या मोठ्या जागी झेप घेऊन नाव कमावले असल्याचे त्याने म्हटले. "खेळताना कल्पना करणं खूप महत्त्वाचं आहे आणि लहान जागी खेळल्यामुळे काहीही फरक पडत नाही. तिथे काहीतरी वेगळं झाल्यामुळेच मोठ्या जागी चांगले प्रदर्शन करता येते. माझ्या प्रशिक्षकांनी मला टेनिस बॉलने यॉर्कर कसा टाकायचा ते शिकवले. जर तुम्ही बुमराहला विचारले तर तो म्हणेल की ते खूप सोपे आहे." असे श्रीसंतने सांगितले. 

दरम्यान, यावर्षीच्या मार्चमध्ये श्रीसंतने निवृत्तीची घोषणा केली होती. "माझ्या कुटुंबाचे, माझ्या संघातील खेळाडूंचे आणि भारतातील लोकांचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. खेळावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जड अंतकरणाने सांगतो की मी देशांतर्गत क्रिकेटमधून देखील निवृत्ती घेत आहे." त्याने भारतीय संघासाठी  २७ कसोटी आणि ५३ एकदिवसीय सामने खेळले असून त्यामध्ये त्याने अनुक्रमे ८७ आणि ७५ बळी पटकावले आहेत. तसेच त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७ बळी घेतले आहेत.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघश्रीसंतभारतीय क्रिकेट संघविराट कोहलीसचिन तेंडुलकर
Open in App