Join us

ऋतुराज गायकवाडने वाट वाकडी केली, महिला क्रिकेटरशी उद्या बांधणार लग्नगाठ

Ruturaj Gaikwad Wife: आयपीएल फायनलनंतर ऋतुराज आणि उत्कर्षा हे दोघेही सीएसकेचा कप्तान महेंद्र सिंग धोनीसोबत दिसले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 08:24 IST

Open in App

क्रिकेटर आणि बॉलिवूडच्या हसिना असे समीकरण असताना मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने वाट वाकडी केली आहे. त्याने आपली जीवनसाथी म्हणून महाराष्ट्रासाठी खेळणाऱ्या महिला क्रिकेटरची निवड केली आहे. उद्या, ३ जून रोजी उत्कर्षा आणि ऋतुराज विवाहबंधनात अडकणार आहेत. 

आयपीएल फायनलनंतर ऋतुराज आणि उत्कर्षा हे दोघेही सीएसकेचा कप्तान महेंद्र सिंग धोनीसोबत दिसले होते. ऋतुराजच्या होणाऱ्या बायकोचं नाव उत्कर्षा पवार असून ती कोण आहे याबाबत क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा रंगली होती. अनेकांना ती हिरोईन, एखादी मॉडेल किंवा त्याची जुनी मैत्रिण असल्याचे वाटले होते. परंतू, उत्कर्षा ही महाराष्ट्राची क्रिकेट प्लेअर आहे. 

ऋतुराजचे अभिनेत्री सायली संजीवसोबत अफेयर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतू, मध्येच उत्कर्षाचे नाव आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता.  ऋतुराज गायकवाडने आगामी WTC फायनलमधून माघार घेतली आहे. यावेळी त्याने विवाहाचे कारण दिले आहे. 

कोण आहे उत्कर्षा...ऋतुराजच्या होणाऱ्या बायकोचं संपूर्ण नाव उत्कर्षा अमर पवार असे आहे. २४ वर्षीय उत्कर्षाचा जन्म १३ ऑक्टोबर १९९८ मध्ये पुण्यात झाला. ती महाराष्ट्राच्या महिलांच्या वरिष्ठ संघात खेळते. ती ऑलराऊंडर आहे. ती फलंदाजीसोबत गोलंदाजी देखील करते. नोव्हेंबर २०२१ मध्ये वरिष्ठ महिला एकदिवसीय ट्रॉफीमध्ये पंजाबविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता.

ऋतुराज आणि उत्कर्षा मागील मोठ्या कालावधीपासून एकमेकांना ओळखत असल्याचे देखील बोलले जात आहे. मागील वर्षी उत्कर्षा एका जिम सेशनमध्ये ऋतुराजसोबत दिसली होती. मात्र, तरीदेखील ऋतुराजची होणारी बायको चाहत्यांसाठी एक मिस्ट्री गर्ल म्हणूनच राहिली आहे. कारण उत्कर्षा पवार सोशल मीडियावर सक्रिय नाही.  

टॅग्स :ऋतुराज गायकवाड
Open in App