Join us  

"आमच्या तरूण किपरने फटकेबाजी करून..."; धोनीचं नाव घेत ऋतुराजने केलं हार्दिकला झोंबणारं विधान

MS Dhoni Hardik Pandya IPL 2024 MI vs CSK: धोनीने हार्दिकला शेवटच्या षटकांत सलग तीन षटकार ठोकले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 11:01 AM

Open in App

MS Dhoni Ruturaj Gaikwad Hardik Pandya, IPL 2024 MI vs CSK: मध्ये रविवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सच्या संघाला २० धावांनी मात दिली. प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाडच्या ६९ आणि शिवम दुबेच्या नाबाद ६६ धावांच्या बळावर चेन्नईने चांगली मजल मारली. शेवटच्या षटकात महेंद्रसिंह धोनीने तीन षटकार मारून संघाला २०६ पर्यंत मजल मारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने पहिल्या १२ षटकांत दमदार कामगिरी केली. पण नंतर मुंबईची गाडी रूळावरून घसरली. रोहित शर्माने एकाकी झुंज देत नाबाद १०५ धावा केल्या. त्या जोरावर मुंबईने १८६ धावांपर्यंत मजल मारली. पण तरीही मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. हार्दिक पांड्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाला सहापैकी चार सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. तशातच सामन्यानंतर CSKचा कर्णधार ऋतुराज जे बोलला त्याने हार्दिकच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी स्थिती झाली.

सीएसकेच्या विजयानंतर जेव्हा कर्णधार गायकवाडला विजयाचे कारण विचारण्यात आले तेव्हा त्याने धोनीचे नाव घेतले. गायकवाड म्हणाला की, आमच्या युवा यष्टीरक्षकाने तीन षटकार मारले आणि त्यामुळे संघाला खूप फायदा झाला. त्यामुळेच सामन्याला कलाटणी मिळाली. गायकवाडचे हे विधान हार्दिक पांड्याला चांगलंच झोंबणारे होते. कारण धोनीने त्याच्याच चेंडूवर सलग तीन षटकार ठोकले होते. धोनी २०व्या षटकात मैदानात आला आणि पांड्याच्या शेवटच्या ४ चेंडूंवर ५०० च्या स्ट्राईक रेटने २० धावा केल्या. योगायोगाने चेन्नई संघानेही २० धावांनीच सामना जिंकला. धोनीच्या त्या तीन षटकारांचा सामन्यात मोठा फरक पडला.

ऋतुराजने गोलंदाजांचे देखील कौतुक केले. गोलंदाजांनी नियोजनानुसार अचूक गोलंदाजी केल्याचे तो म्हणाला. तसेच, पाथीरानाचे त्याने विशेष कौतुक केले. रोहित शर्मा पूर्णपणे क्रीजवर सेट झाला होता पण पाथिरानासमोर तो काहीही करू शकला नाही, ही बाब देखील ऋतुराजने अधोरेखित केली. पाथीरानाने ४ षटकांत २८ धावा देत ४ बळी टिपले. तुषार देशपांडेनेही ४ षटकात केवळ २९ धावा देत १ बळी घेतला. तर  शार्दुल ठाकूरने ४ षटकात केवळ ३५ धावा दिल्या. डेथ ओव्हर्समध्ये वेगवान गोलंदाजांची अप्रतिम कामगिरी चेन्नईला उपयोगी ठरली.

टॅग्स :आयपीएल २०२४महेंद्रसिंग धोनीहार्दिक पांड्यामुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्सऋतुराज गायकवाड